विशालने केलेली आत्महत्या हा तर देवाने दिलेला मृत्युदंड! पीडित मुलीचे पालक काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 06:04 IST2025-04-14T06:03:49+5:302025-04-14T06:04:29+5:30
Vishal Gawali Kalyan News: मुलीबरोबर घडलेल्या प्रकारामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. न्यायासाठी आमचा न्यायालयात लढा सुरूच होता.

विशालने केलेली आत्महत्या हा तर देवाने दिलेला मृत्युदंड! पीडित मुलीचे पालक काय म्हणाले?
कल्याण : आमच्या मुलीने असे काय बिघडवले की अत्याचार करून तिची हत्या केली गेली. नराधम विशालची आत्महत्या ही ‘जैसी करनी वैसी भरनी’ असून देवानेच त्याला दिलेला मृत्युदंड आहे, यामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिली.
मुलीबरोबर घडलेल्या प्रकारामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. न्यायासाठी आमचा न्यायालयात लढा सुरूच होता; परंतु आम्हाला आता न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांचे आभार आहेत.
विशालचे हद्दपार असलेले भाऊ सराईत गुन्हेगार असून त्यांचीही दहशत आहे. त्यांच्या कुटुंबाकडून त्रास किंवा हल्ला होऊ शकतो. त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
मिस यू दीदी
विशाल गवळीने आत्महत्या केल्याचे वृत्त कल्याणमध्ये धडकताच पीडित मुलगी राहत असलेल्या भागामध्ये ‘मिस यू दीदी’ असे बॅनर लागले होते.
विशालच्या आत्महत्येचा आम्हाला कोणताही आनंद झालेला नाही. त्याला फासावर लटकवले असते तर इतर गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली असती. त्याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती. तसे झाले असते तर नक्कीच आनंद साजरा केला असता. -महेश गायकवाड, माजी नगरसेवक
विशाल गवळीला कायद्याने फाशी झाली असती तर असे कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती. कायद्याच्या शिक्षेला घाबरून त्याने आत्महत्या केली असावी. पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला हादेखील नैसर्गिक न्याय मिळाला आहे. -विश्वनाथ भोईर, आमदार, कल्याण (प)
विशालला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. त्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला फाशी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त केले होते. विशालने फाशीच्या भीतिपोटी आत्महत्या केली. तिच्या पालकांना न्याय मिळाला; पण न्यायालयाने फाशी सुनावली असती तर विशालसारख्या नराधमांना जरब बसली असती. -सुलभा गायकवाड, आमदार, कल्याण (पू)
पोलिस प्रशासनाने या गुन्ह्याच्या तपासात चांगले काम केले होते. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच झाली असती; परंतु त्याच्या आत्महत्येमुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. -नीलेश शिंदे, माजी नगरसेवक, शिंदेसेना