पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 04:33 PM2021-07-17T16:33:20+5:302021-07-17T16:35:48+5:30
या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
भिवंडी - महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लाखो वारकऱ्यांना असते. त्यासाठीच आषाढी वारीत लाखो वारकरी टाळ मृदुगाच्या गजरात पायी निघत असतात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षापासून वारीस मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे लाखो वारकऱ्यांचा हिरमोड होत असून मोजक्या वारकऱ्यांसह पायी वारीस परवानगी द्यावी, तसेच ह. भ. प. बंड्यातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी या मागणीसाठी शनिवारी भिवंडीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी संप्रदाय यांनी कल्याण नाका येथील साक्रा देवी मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक दिंडी काढून राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध केला .
विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख पदाधिकारी अॅड मनोज रायचा, भिवंडी शहराध्यक्ष देवराज राका, प्रमिला भोईर ,मुरलीधर नांदगावकर ,बजरंग दल संयोजक दादा गोसावी ,हभप मनोहर महाराज वडजे, हभप सुनील महाराज नाईक,डॉ.दिनकर नाईक ,दुर्गा वहिनीच्या संध्या त्रिपाठी ,मातृशक्तीच्या जयश्री पिंपळे ,बाबूलाल पुरोहित ,वैभव महाडिक ,विजय गुप्ता, पंकज गुप्ता ,कृष्णा माने ,समीर पटेल यांसह वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.