ऑपरेशन महालक्ष्मी : माणुसकीचे घडले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:47 AM2019-07-29T00:47:15+5:302019-07-29T00:48:22+5:30
ऑपरेशन महालक्ष्मी : स्थानिक ग्रामस्थांचा मदतकार्यात मोठा वाटा
अंबरनाथ : महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेले असले तरी या मदतकार्यात सर्वात मोठा सहभाग हा स्थानिक ग्रामस्थांचा होता. चामटोली आणि कासगावातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत पथकाला सहकार्य केले. स्थानिकांच्या मदतीमुळे कमी वेळेत सर्व प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले. या मदतकार्यात केवळ मदतीचे नव्हे तर माणुसकीचे दर्शन घडले.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना सर्वात आधी मदत पोहचवण्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनीच केले. प्रवाशांना बिस्कीट आणि पाणी पोहचवल्यानंतर त्यांच्या सुखरुप सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. एनडीआरएफ आणि नौदलाचे जवान मदतकार्य करत असतांना ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर आलेल्या प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी घेतली. स्थानिक पोलीस आणि सेवाभावी संस्थेचे पदाधिकारीही या कामात होते. चामटोली आणि कासगावच्या मैदानावर प्रवाशांना सुखरुप सोडल्यावर या प्रवाशांच्या बॅग आणि त्यांचे सामान डोक्यावर घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी डोंगर दऱ्यातील ३ किलोमीटरचे अंतर पार केले. सामान घेऊन डोंगर चढणे प्रवाशांना शक्य होणार नाही याची कल्पना असल्याने ग्रामस्थांनी त्यासठी पुढाकार घेतला. काही तरुणांनी वृध्द आणि आजारी व्यक्तींना आधार देत चामटोली गावात आणले. कासगांव ते चामटोली हे अंतर डोंगरावरील असल्याने आधीच थकलेल्या प्रवाशांना पुन्हा डोंगर चढून चामटोली गावात येणे शक्य नव्हते. मात्र चिखलातून रस्ता काढत प्रवाशांना सह्याद्री हॉलमध्ये सुरक्षित आणण्यात आले. काही ठिकाणी प्रवाशांना आपले सामानही घेऊन चढणे शक्य होत नव्हते, अशा वेळी सह प्रवाशांनीही त्यांना मदत केली. एकमेकांना साथ देत प्रवासी या धोक्यातून बाहेर पडले.
कासगावच्या डोंगरावरुन चढून चामटोलीत आलेल्या प्रवाशांना आराम करण्यासाठी आणि बसण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांमध्ये आसनव्यवस्था केली होती. चामटोली गावातील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत प्रत्येक प्रवाशाला पाण्याची, चहाची आणि बिस्कीटची सोय केली होती. काहींनी या प्रवाशांसाठी खिचडीची सोय केली होती. प्रत्येक ग्रामस्थ आपआपल्यापरीने प्रवाशांची सोय करत होते. काही महिलांनी घाबरलेल्या महिलांचे मनोबल वाढवण्याचे कामही केले. त्यांना धीर देत मदत कक्षापर्यंत नेले.
मदतकार्यात स्थानिक ग्रामस्थांसोबत बदलापूर शहरातील राजकीय पुढारीही सहभागी झाले होते. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष अॅड. प्रियेश जाधव, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी आणि त्यांची सर्व टीम या मदतकार्यात सहभागी झाली होती. आजारी महिलांना आणि वृध्दांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.
मदतीसाठी येणाºया गाड्यांना कोंडीचा फटका
वाहतुकीचा खोळंबा
एकीकडे मदतकार्य सुरू असताना दुसरीडके रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्यांवर खाजगी वाहने वाढल्याने मदत कार्यासाठी येणाºया गाड्या आणि बस या अडकून पडत होत्या. त्यांना पुन्हा घटनास्थळी नेण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.
मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर
मदत कार्यासाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात आल्याने चामटोलीतील सर्वच रस्ते गाड्यांनी भरले होते. त्यामुळे वाहने बाहेर काढणे चालकांना अवघड जात होते. खाजगी वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक पोलिसांचा मात्र प्रयत्न अपयशी ठरला.