कल्याणमध्ये सात चित्ररथांतून घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:46 PM2019-08-09T23:46:45+5:302019-08-09T23:46:49+5:30
जागतिक आदिवासी दिन उत्साहात : शोभायात्रा ठरली प्रमुख आकर्षण, विविध भागांतील पाच हजार महिला-पुरुष झाले सहभागी
कल्याण : आदिवासी संस्कृतीला फार मोठा वारसा लाभला आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी शहरात काढलेल्या शोभायात्रेतून या समृद्ध संस्कृतीचे दर्शन नागरिकांना घडले. पश्चिमेतील सुभाष मैदानातून निघालेल्या या शोभायात्रेत सात चित्ररथांसह नृत्यकला व वादनकला सादर करण्यात आली. बरसणाऱ्या श्रावणसरींत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आदिवासी महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
जगभरात ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त आदिवासी उत्सव समिती या संस्थेच्या पुढाकाराने विविध आदिवासी संस्था या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. आदिवासी हे मूळ निवासी असून त्यांच्या हक्कांसाठी देशभरात विविध संस्था लढा देत आहेत. आदिवासी संस्कृती, न्यायहक्क आणि त्यांच्या लढ्याचे अन्य समाजबांधवांना दर्शन घडवण्यासाठी दरवर्षी कल्याणमध्ये शोभायात्रा काढली जाते. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि टिटवाळा येथील सुमारे पाच हजार आदिवासी या यात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे उद्घाटन केडीएमसी महापौर वनीता राणे यांनी केले. यंदाचे शोभायात्रेचे पाचवे वर्ष होते. शुक्रवारी सुभाष मैदानातून काढलेल्या शोभायात्रेत आदिवासी महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच आदिवासी वाद्ये वाजवून अनेकांनी जल्लोष केला. त्याचबरोबर आदिवासी देवदेवतांची वेशभूषाही केली होती. आदिवासींनी ‘उल गुलान का चला नारा, बिरसा मुंडा झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या यात्रेत उपायुक्त मारुती खोडके, नगरसेविका शीतल मंडारी, संयुक्त आदिवासी उत्सव समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेची सांगता विजयनगर येथे झाली.
वाघेरपाडा जि.प. शाळेतही उत्साह
कल्याण : वाघेरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘विन होम’ या सामाजिक संस्थेतर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या शाळेत आदिवासी मुले शिक्षण घेत आहेत. कल्याण शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर छोटछोट्या आदिवासीवाड्या आहेत. कार्यक्र माच्या सुरुवातीला शाळेतील मुलांकडून जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विशाल जाधव यांनी ‘टेकडीच्या पायथ्याला छोटंसं गाव रं, आदिवासीराजा हाय तुझं नाव रं’ हे आदिवासी गीत गाऊन सर्वांना वंदन केले. आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेलही, पण त्यांच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी त्यांची नाळ जुळली असल्याने त्यांच्यावर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसतो. दैनंदिन जीवनात तो नियमित जंगल व त्यातून मिळणाºया गोष्टीवर आजही अवलंबून राहत आहे. मनात कोणत्याच प्रकारची भीती बाळगू नका, कठोर मेहनत व सातत्याने यश नक्कीच मिळते, हे लक्षात ठेवावे, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केले. रिचर्ड मेरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी जि. प. शिक्षक आशा शिंगाडे, बाबू गवारी तसेच ग्रामस्थ सागर मरकडे, प्रवीण हिंडोले, सुनील मांगे, विलास लचके, नामदेव ठोंबरे
उपस्थित होते.
टिटवाळा येथे काढली रॅली...
टिटवाळा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी टिटवाळा येथे श्रमजीवी संघटनेतर्फे रॅली काढण्यात आली. यात शेकडो आदिवासी महिला व पुरुष पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. यावेळी आदिवासींनी पारंपरिक नृत्य व कलांचे दर्शन घडवले. टिटवाळा येथील सावरकरनगर येथून रॅलीला सुरुवात झाली. टिटवाळा गणपती मंदिर प्रांगणात सभा घेऊन समारोप झाला. रॅलीमध्ये श्रमजीवी संघटना ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, कल्याण तालुकाध्यक्ष विष्णू वाघे, नगरसेवक संतोष तरे, गीता फसाले आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.