अनुजा अवकाश केंद्रास तारांगण शास्त्रज्ञांची भेट
By admin | Published: January 3, 2017 05:28 AM2017-01-03T05:28:13+5:302017-01-03T05:28:13+5:30
डहाणू तालुक्यातील कासा येथील खगोलप्रेमी चंद्रकांत घाटाळ यांनी मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुजा अवकाश संशोधन केंद्र सुरू केले
शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तालुक्यातील कासा येथील खगोलप्रेमी चंद्रकांत घाटाळ यांनी मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुजा अवकाश संशोधन केंद्र सुरू केले असून नुकताच नेहरू तारांगण येथील शास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘पिधान’ च्या नोंदीसाठी भेट दिली.
मुंबई येथील नेहरू तारांगण येथील शास्त्रज्ञांच्या एका गटाने एका खगोलीय घटनेचा अभ्यास करण्यासाठी थेट कासा येथील अनुजा अवकाश संशोधन केंद्रास तातडीने भेट दिली. २५ डिसेंबर रोजी पहाटे ३:२७ वाजता एक महत्वाची खगोलीय घटना घडणार होती. एक लघुग्रह एका ताऱ्याला झाकणार होता. याला खगोलीय भाषेत ‘पिधान’ असे म्हणतात. ही घटना फक्त काही सेकंद दिसणार होती. त्या घटनेच्या वेळेस ज्या नोंदी घेतल्या जातात त्यामुळे त्या लघुग्रहाचे आकारमान किती असावे याचा अंदाज करता येतो. असे अभ्यासकांचे मत आहे. अशा प्रकारच्या खगोलीय दुर्मिळ घटनेचा अभ्यास येथे करण्यात आला.
या दुर्मिळ घटनेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय शांत आणि मोकळे अवकाश लागते. यासाठी नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी चंद्रकांत घाटाळ यांच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रम निश्चित केला होता. त्यासाठी शास्त्रज्ञांनी टेलीस्कोप आणले होते. येथील गावदेवी मैदानात हे निरिक्षण करण्यात आले. दरम्यान लोकांनी गर्दी करून व्यत्यय आणू नये म्हणून घाटाळ यांच्याकडून गुप्तता पाळल्याचे सांगण्यात आले. निरिक्षणा दरम्यान व्यवस्था करतांना जि.प. सदस्य किशोर बरड व कासा बरडपाडा येथील मुलांनी विशेष मेहनत घेतली.
(वार्ताहर)