भाविकांना ऑनलाइन दर्शन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:36+5:302021-09-12T04:45:36+5:30
ठाणे : कोरोनाचा विचार करता राज्य शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात ...
ठाणे : कोरोनाचा विचार करता राज्य शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाविकांना केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ठामपा प्रशासनाने दिले आहेत. सर्व मंडळांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, याबाबतची मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठामपा प्रशासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत भाविकांच्या दर्शन रांगामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व मंडळांना श्रींचे दर्शन केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------