‘त्या’ नगरसेवकांच्या गावात संघर्ष समितीचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:34 AM2020-02-22T00:34:30+5:302020-02-22T00:34:48+5:30
२७ गावांचा मुद्दा : विरोधकांशी साधणार संवाद
कल्याण : केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यास काही नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिली आहे.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा एक गोपनीय बैठक पार पाडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, गगाजन मांगरूळकर, दत्ता वझे आदी उपस्थित होते.
महापालिकेतून २७ गावे वगळू नयेत, अशी मागणी केवळ पाच नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे रविवारपासून त्या नगरसेवकांच्या गावात जाऊन तेथील नागरिकांशी समितीचे पदाधिकारी संवाद साधणार आहेत. त्यातून गाव वगळण्यास नागरिकांचा विरोध आहे की, तेथील नगरसेवक समितीच्या भूमिकेच्या विरोधात आहे, हे स्पष्ट होईल. संवाद साधण्याची ही प्रक्रिया मंत्रालयात पुन्हा दुसरी बैठक होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल.
२०१५ मध्ये समितीने महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपने कमळाच्या निशाणीवर उमेदवार उभे केले. समितीचा पाठिंबा होता म्हणून हे नगरसेवक निवडून आले.
भाजपने निवडणुकीतही फसवणूक केली. तसेच पाच वर्षे गावे वगळण्याचे गाजर दाखविले. आता महाविकास आघाडी सरकारकडून गावे वगळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार काही मंडळी करीत असल्याचा आरोप समितीने बैठकीत केला.
पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत
२७ गावांबाबत शिवसेनेची भूमिका यापूर्वी वेगळी होती. आता शिवसेना अनुकूल होत असताना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेशी प्रतिकूल मत व्यक्त करणे कितपत योग्य आहे, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला.