तेलंगणा राज्य वित्त आयोगाची ठाणे जिल्हा परिषदेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:06 PM2018-10-24T21:06:16+5:302018-10-24T21:06:32+5:30
तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणि आयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.
ठाणे : तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणि आयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी बुधवारी ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले. त्याच बरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील सोई-सुविधां बाबतही आयोगाने चर्चा केली.
जिल्हा परिषदेने राबवलेल्या केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून आयोगाला माहिती दिली. आयोगाने जिल्हा परिषदेने राबवलेल्या योजनां बद्दल समाधान व्यक्त केले.आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाचे आर्थिक बळकटीकरण होण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाय योजना करायला हव्यात, त्यासाठी निधीची उपलब्धता कसा प्रकारे करायला हवी याविषयी संगोपांग चर्चा केली.
यावेळी समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, अंबरनाथ पंचायत समिती सभापती स्वप्नाली भोईर, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, पुष्पा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव , उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगणे, भिवंडी पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के आदि मान्यवर उपस्थित होते.