विठूच्या गजराने दुमदुमली कल्याण-डोंबिवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:39 AM2018-07-24T02:39:07+5:302018-07-24T02:39:39+5:30
विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, दिंडी आदी धार्मिक कार्यक्रम सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत पार पडले.
डोंबिवली : विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, दिंडी आदी धार्मिक कार्यक्रम सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत पार पडले. शहरांतील विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
हरि ओम रेल्वे प्रवासी भजनमंडळ, दिवा-डोंबिवली यांच्यातर्फे डोंबिवली स्थानकातील प्लॅटफार्म नं. १ वर आषाढी एकादशी सोहळा रंगला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाटे ५.३० वाजता विठ्ठलाचे पूजन केले. तुळशीमाळांनी मूर्तीची सजावट करण्यात आली. भजनाचे स्वर स्टेशन परिसरात घुमले. स्थानकात आलेल्या प्रवाशांनीही विठ्ठलाचे दर्शन घेतले.
गणेश मंदिर तसेच संत नामदेव पथावरील विठ्ठल मंदिरातही विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गणेश मंदिरात नारायणाचा अवतार म्हणून मंदिरातील विठ्ठल मूर्तीची पुरुषसुक्त मंत्रांनी पंचामृती पूजा करण्यात आली. निलेश सावंत यांनी विठ्ठलाची पूजा केली. तर, गद्रेबुवा यांचे कीर्तन झाले.
निळजे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शीतल पाटील व प्रिती कांबळे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. प्रथमेश कांबळे यांनी त्यांना साथ दिली. भारत विकास परिषदेने ७५० तुळशीच्या रोपांचे वाटप केले. आयरे रोड येथील विठ्ठल मंदिरात भक्तांनी माऊलीचे दर्शन घेतले.
भोपर गावात धर्मा चॅरिटेबल ट्रस्ट व जे. के. पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. त्यात सहभागी झालेल्या २५० विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जागृती केली. शाळेचे संचालक गजानन पाटील यांनी ही संकल्पना रुजवली आहे. झाड लावून संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्याला अधिक १० गुण दिले जाणार आहेत.
मंदिराच्या प्रांगणात दिंडी स्थिरावल्यावर तेथे विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा फेर धरला. तर, मारुती मंदिराजवळ विद्यार्थ्यांनी विठूनामाचा जयघोष केला. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, नामदेव आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह ग्रामस्थांना आवरला नाही.