विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

By admin | Published: March 7, 2016 02:13 AM2016-03-07T02:13:20+5:302016-03-07T02:13:20+5:30

जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा

Vivek Pandit will be active in Vasai | विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

विवेक पंडित वसईत पुन्हा सक्रीय होणार

Next

शशी करपे,  वसई
जनआंदोलनही अंधारातील ज्योत आहे. ती विझू देऊ नका. अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून एकत्रितपणे, नव्या पिढीला सोबत घेऊन लढा सुरु ठेवा. सत्ता मिळविणे, निवडून येणे हे आपले उद्दीष्ट नाही. लोकांच्या हितासाठी लढत राहिले पाहिजे. त्यासाठी श्रमजीवीच्या फौजेसह आपल्यासोबत कायम राहिन. आव्हान मोठे आहे. पण, संघर्ष केल्यास वसईत २००९ ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार आणि जनआंदोलन समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी शनिवारी रात्री वसई गिरीज येथे झालेल्या जनआंदोलनाच्या सभेत बोलताना व्य्नत केला.
गावाचा प्रश्न तापल्यानंतर वसईत राजकीय धु्रवीकरण होऊन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जनआंदोलनाच्या बॅनरखाली पंडितांनी विजय मिळवला होता. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी २१ नगरसेवक निवडून आणले होते. इतकेच नाही तर ठाणे जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा मिळवत वसई पंचायत समितीवरही सत्ता मिळवली होती. त्यामुळे वसईत ठाकूरांपुढे मोठे आव्हान तयार झाले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने ते वसईतून दूर गेले होते. पालिका , जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते दूर राहिल्याने जनआंदोलनाची पिछेहाट होऊन जनआंदोलन समिती एकाकी पडली होती.
वसईपासून दुरावलेल्या पंडितांनी वसई वगळता पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामधील श्रमजीवीच्या माध्यमातून मोठमोठी आंदोलने सुरु केली. तसेच नुकत्याच झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन प्रचारात भाग घेतला होता. आता वसई आणि जनआंदोलनापासून दूर असलेले पंडित अचानक जनआंदोलनाच्या व्यासपीठावर हजर झाले. ५ मार्च २०१० रोजी पोलिसांनी वाघोली येथे लोकांवर केलेल्या अत्याचाराला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पंडित म्हणाले की, वसईत दिसत नसलो तरी वसईतील राजकारण सोडलेले नाही.
पालघर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात माझाही वाटा आहे. वसईतही त्यांना रोखणे अवघड नाही. वसईत २००९ ची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी चर्चा करीत न बसता अहंकार, मतभेद , मोठेपणा विसरून नव्या पिढीला सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे. नुसत्या चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. मी स्वत: श्रमजीवीला सोबत घेऊन ताकदीनिशी जनआंदोलनाच्या प्रत्येक लढ्यात सहभागी होईन, असे सांगितले. पंडित अद्यापही शिवसेनेचे उपनेते असून जनआंदोलन समितीचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पंडित पुन्हा एकदा वसईच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Web Title: Vivek Pandit will be active in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.