विवेकानंद-सहस्रबुद्धे! आंबेडकर-गडकरी!!
By admin | Published: January 14, 2017 06:18 AM2017-01-14T06:18:33+5:302017-01-14T06:18:33+5:30
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यात झाली. त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या सभागृहाला
ठाणे : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यात झाली. त्यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या सभागृहाला दिवंगत नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे नाव देण्यात आले होते. या ठिकाणी असलेल्या खांबांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या काही जुन्या नेत्यांसोबत तसेच राष्ट्रपुरुषांसोबत भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री व नेते यांची छायाचित्रे असलेले बॅनर्स लावले होते. अशा जोड्या जुळवलेले बॅनर लावण्यामागे नेमका हेतू काय होता, त्याचा उलगडा झालेला नाही.
हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान शिकागोमधील सर्वधर्म परिषदेत प्रभावीपणे मांडणारे स्वामी विवेकानंद यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांचे, तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावले होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पोस्टर झळकले, तर सध्या विजनवासात गेलेले नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असलेले पोस्टर औचित्यपूर्ण होते, तर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एका पोस्टरवर दाखवण्यात आले होते.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेले अन्य पदाधिकारी ज्या सभागृहात बसले होते, तेथेच हे बॅनर्स लावण्यात आले होते आणि त्यावरील ‘जोड्या’ पाहून तेही स्तिमित झाले होते. यासोबत उपाध्याय, मुखर्जी, वाजपेयी, अडवाणी यांची गाजलेली वचने उद््धृत केली होती. पक्षाचा इतिहास आणि वर्तमान यांचा तौलनिक आढावाही मांडण्यात आला होता. (प्रतिनिधी)