व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही लुटला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ आयोजित 'भोंडल्या'चा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:36 PM2018-10-16T15:36:10+5:302018-10-16T15:39:46+5:30
धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाने भोंडला आयोजित केला होता, यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ठाणे : आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यात 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता.
काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली असताना ती जिवंत ठेवण्यासाठी धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने जांभळी नाका येथील समर्थ मंदिर सभागृह येथे हा उपक्रम साजरा केला. धनगर समाजामधील महिलांसाठी खासकरून आयोजित करण्यात आलेल्या या भोंडल्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मधोमध ठेवून तिच्याभोवती महिला फेर धरतात... ऐलमा,पैलमा गणेश देवा, शिवाजी आमचा राणा, एक लिंबू झेलू बाई एक लिंबू झेलू आणि अक्कन माती चिक्कन माती यांसारख्या पारंपरिक गीतांवर महिलांचे पावलं थिरकली. भोंडल्यामध्ये गाणी आणि खेळ झाल्यानंतर डब्यातील खाऊ ओळखण्याचा मजेशीर खेळ असतो. डब्बा हलवून डब्यात काय आहे हे ओळखयाचं आणि खावू मिळवायचा. भोंडल्याला काही ठिकाणी हादगा, भुलाबाई असेही म्हटलं जातं. मराठवाड्यात याची ओळख भूलाबाई अशीच आहे. या सगळ्यात महिलांचा आनंद तर पाहण्यासारखा होता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एकदिवस महिलांना आपल्या मनाजोगता आनंद लुटता आल्याने महिलेच्या चेहऱ्यावर एकाच आनंद पाहण्यास मिळत होता