व्हॉलिबॉल कोर्टची दुरवस्था; लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:34 PM2020-01-03T23:34:24+5:302020-01-03T23:34:26+5:30
बेकायदा पार्किंग, रात्रीच्यावेळी गर्दुल्ल्यांचा वावर
- सदानंद नाईक
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या व्हॉलिबॉल कोर्टाची दुरवस्था झाली आहे. आज तेथे बेकायदा पार्किंग, गर्दुल्ले, नशाखोरांचा अड्डा झाला आहे. महापालिकेने वेळीच लक्ष दिले नाहीतर मोठी दुर्घटना होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली असून कोर्टवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेने गोलमैदानातील मिडटाउनच्या बाजूला तत्कालीन महापौरांच्या निधीतून लाखो रुपये खर्चून हे कोर्ट उभारले. मात्र, दीड ते दोन वर्षांत त्याची दुरवस्था झाली. व्हॉलिबॉल कोर्ट कुलूपबंद दिसत असले तरी प्रवेशद्वार उघडे असते, अशी स्थिती आहे. शेजारील पाणीपुरीवाल्याकडे प्रवेशद्वाराची चावी ठेवलेली असून गेट आपोआप उघडत असल्याने शेजारील दुकानदार, नागरिक थेट कोर्टमध्ये आापल्या गाड्या उभ्या करतात. तसेच पाणीपुरीचा ठेला रात्री कोर्टमध्ये ठेवला जातो. मैदानात सर्वत्र सांडपाणी पसरले असून दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. व्हॉलिबॉलच्या मैदानात गर्दुल्ले, भुरटे चोर आदींचा रात्रीच्यावेळी कब्जा असतो. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कोर्टसमोर मुख्य रस्त्यावर बॉल खेळताना मुलगा असा पुतळाही त्यावेळी उभारला आहे. हे कोर्ट बांधण्यावर व सुशोभीकरणावर तब्बल ९० लाखांचा खर्च केल्याचे बोलले जात आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. केवळ दीड ते दोन वर्षात व्हॉलिबॉल कोर्टची दुरवस्था झाल्याने महापालिकेच्या एकूणच कारभारावर सर्वस्तरांतून टीका होत आहे. तसेच नागरिक तेथे खेळायला जात नसून व्हॉॅलिबॉल कोर्टचा ताबा कुणाकडे आहे, येथून वाद सुरू झाला. स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. गौलमैदानातील उद्यानात सुरक्षाव्यवस्था नसल्याने खुनी मैदान म्हणून प्रसिद्ध झाले. तशीच अवस्था या कोर्टची होऊ नये, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गौलमैदान परिसरात दिग्गजांचे कार्यालय
गोलमैदानातील मिडटाउन शेजारी व्हॉॅलिबॉल कोर्ट उभारले आहे. तेथून काही फुटांच्या अंतरावर खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असून शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांचा येथे राबता असतो. आमदार कुमार आयलानी यांच्यासह ओमी टीमचे कार्यालय मैदानाशेजारी आहे. असे असताना लाखो रुपये खर्चून उभे राहिलेल्या व्हॉलिबॉल कोर्टची दीड ते दोन वर्षांत कशी दुरवस्था झाली, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.