‘स्वेच्छानिवृत्ती द्या, पण रिक्त पदेही भरा’, ताणामुळे निवृत्ती : नगरसेवकांनी वेधले आयुक्तांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:48 AM2017-10-12T01:48:22+5:302017-10-12T01:48:33+5:30
केडीएमसीच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दाखल झालेल्या उपअभियंता प्रताप पवार यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
कल्याण : केडीएमसीच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दाखल झालेल्या उपअभियंता प्रताप पवार यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. सध्या अधिकाºयांचा निवृत्तीकडे वाढता कल पाहता ते कामाच्या तणावामुळे दडपणाखाली असल्याकडे सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त पी. वेलरासू यांचे लक्ष वेधले. स्वेच्छानिवृत्ती द्या, पण रिक्त पदेही तातडीने भरा, अशी सूचना या वेळी नगरसेवकांनी केली.
पवार यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेच्या वेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी अधिकारी कामाच्या तणावामुळे दडपणाखाली असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आधीच अधिकाºयांची कमतरता असल्याने त्यांच्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे हे अधिकारी मानसिक तणावाखाली वावरत असल्याकडे पेणकर यांनी लक्ष वेधले. अन्य खात्यांची अतिरिक्त जबाबदारी आणि ताण, यामुळे अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. ही बाब गंभीर असून याचा प्रामुख्याने विचार होणे अपेक्षित असल्याचे मत पेणकर यांनी या वेळी मांडले.
आयुक्त पी. वेलरासू आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पेणकर यांच्या मुद्याचे समर्थन केले. सदस्य श्रेयस समेळ यांनीही स्वेच्छानिवृत्ती देण्यासाठी कोणाचा विरोध नाही. परंतु, रिक्त पदांवर नव्याने नियुक्त्या केल्या जात नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आजही अभियंता आणि उपअभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे शासनमान्य असतानाही ती कायमस्वरूपी का भरली जात नाहीत, असाही सवाल समेळ यांनी केला. अनेक अभियंत्यांना अन्य महापालिकांच्या होणाºया निवडणुकीच्या कामांसाठीही जुंपले जाते, हा मुद्दाही या वेळी मांडण्यात आला.