स्वयंसेवक फोडणार वाहतुकीची ‘कोंडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:09+5:302021-07-26T04:36:09+5:30
डोंबिवली : शहरातील कोपर उड्डाणपुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढलेल्या वाहतुकीमुळे लगतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचे ...
डोंबिवली : शहरातील कोपर उड्डाणपुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढलेल्या वाहतुकीमुळे लगतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र सकाळ-संध्याकाळ पहायला मिळत आहे. वाहनांचा वाढता पसारा आणि अपुरे मनुष्यबळ यात ही कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असताना त्यांच्याच पुढाकाराने शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन, डोंबिवली यांच्यावतीने सध्या २२ जणांची वाहतूक स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कमकुवत झालेला कोपर उड्डाणपूल सप्टेंबर २०१९ मध्ये तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तो पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. जूनमध्ये पूल बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे केडीएमसीकडून सांगितले जात आहे. मात्र, या पुलाचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. या कालावधीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत असून रस्ते अरुंद असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, आता ही कोंडी सुटण्यासाठी वाहतूक स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. वाहतुकीचे उत्तम नियमन व्हावे तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने ही संकल्पना राबविली जात आहे. ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या संकल्पनेचा शुभारंभ झाला आहे. आतापर्यंत २२ स्वयंसेवक शहरातील विविध भागांत वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन, वाहतूक स्वयंसेवकचे संस्थापक अध्यक्ष विशाल शेटे यांनी दिली. या कामाचा कुठलाही मोबदला आम्ही घेत नाही. हे काम करताना डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि राजश्री शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे शेटे यांनी सांगितले.
----------------------------------------
फडके रोड एक दिशा मार्ग, चार रस्ता सिग्नल, पाटकर शाळा रोड, केळकर रोड एक दिशा मार्ग, मच्छी मार्केट, द्वारकाधीश हॉटेल यासह शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली तर त्याठिकाणी बीट मार्शलप्रमाणे पोहोचून ती कोंडी सोडविण्यासाठी विशेष चार ते पाच स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.
----------------------------------------
फोटो आहे