मतदान करा अन् एक दिवसाचा पगार मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 01:05 AM2019-04-21T01:05:44+5:302019-04-21T06:44:03+5:30
डॉ. बेडेकरांचा अभिनव उपक्रम; मतदान वाढवण्याकरिता उचलले पाऊल
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : ठाणे या सुशिक्षितांच्या शहरात प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अत्यल्प असते. मतदान वाढवण्याकरिता या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक आयोगाने बरेच उपक्रम हाती घेतले असले, तरी ‘मतदान करा आणि एक दिवसाचा पगार मिळवा’, असा अभिनव उपक्रम ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. महेश बेडेकर यांनी अमलात आणण्याचा निर्धार केला आहे. आपल्या रुग्णालयात ते हा उपक्रम राबवत असून जे कर्मचारी मतदान करतील, त्यांना डॉ. बेडेकर बक्षिसाच्या रूपात एक दिवसाचा पगार देणार आहेत.
वेगवेगळ्या डॉक्टर्स, वकील, उद्योजक, व्यापारी यांनीही आपल्याकडील कर्मचाऱ्यांना मतदानाकरिता उद्युक्त करण्याकरिता असे उपक्रम राबवावे, अशी अपेक्षा डॉ. बेडेकर यांनी व्यक्त केली. जास्तीतजास्त नागरिकांनी मतदान करणे, हे प्रबळ लोकशाहीकरिता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान करणे, हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी ते बजावलेच पाहिजे, असे सोशल मीडियापासून ते माउथ टू माउथ पब्लिसिटीद्वारे सांगितले जात आहे. तरुणांमध्येही याविषयी जागृती केली जात आहे. यासाठी ठाण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत काही कट्ट्यांवर कार्यक्रम घेतले जात आहेत. परंतु २९ एप्रिल रोजी जेव्हा देशात व ठाण्यात चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे, तेव्हा लागून सुटी येत असल्याने अनेक कुटुंबे पिकनिककरिता निघून जाण्याची दाट शक्यता आहे. आपण मतदान केले नाही, तर काय बिघडते? तसेही सर्वच पक्ष व राजकीय नेते चोर आहेत व त्यामुळे त्यांना कशाला मतदान करायचे, अशी मानसिकता ठाणे, मुंबईतील उच्च मध्यमवर्गीयांची गेल्या काही वर्षांत दिसून आली आहे. मात्र, मतदान न करता बाहेर फिरायला जाणारा हाच उच्च मध्यमवर्गीय अनेक समस्यांवरून सरकारवर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा टिष्ट्वटरवर तोंडसुख घेत असतो. अशा प्रवृत्तीच्या डोळ्यांत अंजन घालण्याकरिता डॉ. बेडेकर यांनी मात्र मतदानाविषयी जागृती करण्यासाठी हा फंडा वापरला आहे.
नागरिकांना मतदानाद्वारे पाच वर्षांतून आपले मत देण्याची संधी मिळते. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाही आपल्याला खूप काही देते. परंतु, दुर्दैवाने याची किंमत लोकांना नाही. या उत्सवात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, म्हणून हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझे नियंत्रण हे माझ्या रुग्णालयातील स्टाफवर आहे. त्यांना मतदान करण्याची सक्ती नाही, पण आवाहन करू शकतो. कुटुंबासह त्यांनी मतदान करावे, यासाठी जागृती करीत असल्याचे बेडेकर म्हणाले.
प्रबोधनाची गरज
मतदान केल्याची शाई दाखवल्यास त्यांना एक दिवसाचा पगार बक्षिसाच्या रूपात दिला जाणार आहे. तसेच शाळा, कॉलेज, कंपन्या, रुग्णालय, हॉटेल्स, संस्था अशा अनेक ठिकाणी मतदानाविषयी प्रबोधनाची गरज आहे. भविष्यात, माझ्या १०० टक्के स्टाफने मतदान करावे, असा मानस बेडेकर यांनी सांगितले. याआधी त्यांनी आपल्या स्टाफला घेऊन प्लास्टिकविरोधी मोहीम हाती घेतली होती.