‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 06:03 AM2024-10-12T06:03:03+5:302024-10-12T06:04:29+5:30
मुख्यमंत्र्यांनी टेंभीनाका येथील देवीची कुटुंबासह आरती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्यात विविध योजना, प्रकल्प सुरू आहेत. या योजना, विकासकामे पुढे सुरू राहावी, अशी इच्छा असेल तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे केडीएमसीच्या अखत्यारीतील २७ गावांतील ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करण्याच्या शासन निर्णयानिमित्ताने आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी शिंदे पिता-पुत्र यांचे आभार व्यक्त केले.
टेंभीनाका येथील देवीची कुटुंबासह आरती
शिंदे यांच्या हस्ते उपवन तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट, नळपाडा येथील मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल, कासारवडवली तलाव, श्रीराम मंदिराजवळ, घोडबंदर रोड, मोघर पाडा तलाव, तसेच कशिश पार्क येथील स्व. आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका, हाजुरी येथील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या इमारतीचा विस्तार आदी कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी टेंभीनाका येथील देवीची कुटुंबासह आरती केली.