मतदान केले युतीला झाली तिहेरी आघाडी: ठाण्यातील महिलेने दिले न्यायालयात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:03 PM2019-11-25T22:03:27+5:302019-11-25T22:42:26+5:30
एकीकडे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आमदार अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी विचित्र आघाडी एकत्र आली आहे. त्यामुळे युतीला मतदान केलेले असतांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सत्तेसाठी एकत्र येत असेल तर ही जनतेची फसवणूक आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी याचिका ठाण्यातील प्रिया कुलकर्णी या माहिती अधिकार कार्यकर्तीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
लोेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे:राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून महिना उलटला. तरीही महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. काँग्रेस आघाडीला दूर ठेवण्यासाठी मतदारांनी शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, एकत्रित निवडणूक लढवूनही युतीची ताटातूट झाली. शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करुन मतदारांची फसवणूक केली जात आहे. याचाच जाब विचारण्यासाठी ठाण्यातील प्रिया चौहान कलकर्णी या जागरुक महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मतदारांची फसवणूक करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील कळवा परिसरातील सह्याद्री गृहसंकुलात राहणा-या कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,शिवसेना भाजप युतीने विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढविल्या. निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता प्रस्थापित होईल, याच मानसिकतेतून मतदार राजाने युतीतील शिवसेना भाजपच्या उमेदवाराना मतदान केले. निवडणूकीच्या निकालानंतर निकालानंतर मात्र युती तुटली. सत्तेच्या स्वार्थापोटी दोन्ही पक्षांनी आपल्या स्वतंत्र चुली मांडल्या. गेली महिनाभर चर्चांचे गु-हाळ आणि आरोपांच्या फैरी यांनी जनता मेताकुटीला आली आहे. जनतेचे सर्व प्रश्न बासनात गुंडाळून हे पक्ष एकमेकांना शह काटशह देण्यात रमले आहेत. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत सहभागी होत असल्याने ज्या मतदारानी युतीला मतदान केले त्या मतदारांची घोर फसवणूक झाली आहे. मतदारांचा हा अपमान आहे. त्यामुळे मतदाराची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असेही या याचिकेत कुलकर्णी यांनी म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या 2 डिसेंबर रोजी होणार आहे.