बांगलादेशी घुसखोरांजवळ आढळली मतदार ओळखपत्रे; ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:17 AM2018-04-21T01:17:18+5:302018-04-21T01:17:18+5:30
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भिवंडीतील दोन महिलांची चौकशी सुरू असताना त्यादेखील बांगलादेशी घुसखोरच असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्रांसह इतर कागदपत्रेही आढळली आहेत.
ठाणे : बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भिवंडीतील दोन महिलांची चौकशी सुरू असताना त्यादेखील बांगलादेशी घुसखोरच असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्रांसह इतर कागदपत्रेही आढळली आहेत.
चार बांगलादेशी घुसखोर महिलांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ मार्च रोजी कारवाई करण्यात आली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणि महिला कर्मचाºयांच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकून रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना अटक केली होती.
अटक करण्यात आलेल्या चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करत होत्या. संगीता मारिम मुल्ला मोहम्मद मुस्तफा सोनू मुल्ला आणि शामसून्नेहल सिराजऊलहक अन्सारी यांनी या चारही महिलांना बेकायदेशीररीत्या आश्रय दिला
होता. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आश्रयदात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
१२ एप्रिल रोजी पोलिसांनी संगीता सोनू मुल्ला आणि शामसून्नेहल अन्सारी यांना अटक केली. १८ एप्रिलपर्यंत त्या पोलीस कोठडीत होत्या. चौकशीदरम्यान या दोन्ही महिलादेखील बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ पॅनकार्ड, शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्रही आढळले.
त्या बºयाच वर्षांपासून भिवंडी येथे अवैधरीत्या वास्तव्यास होत्या. तपासाअंती पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनचे सीडीआर मिळवले असता, त्या त्यांच्या बांगलादेशातील पतीसोबत नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या उत्पन्नाचा थोडा वाटा त्या एजंटमार्फत बांगलादेशला पाठवत असल्याची माहितीही तपासातून निष्पन्न झाली आहे. दोन्ही महिला सध्या न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोपी महिलांनी भिवंडी येथे जागा विकत घेतली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान तशी माहिती मिळाली आहे. घुसखोरांना अशा प्रकारे जागा विकणे नियमाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांना जागा कुणी विकली, याची माहिती घेतली जात असून या प्रकरणामध्ये त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
- रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, ठाणे