मतदारांची पळवापळवी हा आचारसंहितेचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:19+5:302021-03-30T04:24:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची (टीडीसीसी) निवडणूक जर लोकशाही मार्गाने होत असेल तर मतदारांची पळवापळवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची (टीडीसीसी) निवडणूक जर लोकशाही मार्गाने होत असेल तर मतदारांची पळवापळवी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असे मत टीडीसीसीचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. कोणत्याही निवडणुकीत आचारसंहिता महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.
टीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांची पळवापळवी करण्यात आली असून, ‘लोकमत’ने रविवारी याबाबतचे दिलेले वृत्त खरे असल्याचे बांगर म्हणाले. मुरबाड तालुक्यात ७० मतदार असून, आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला असता बहुतेक मतदार हे आपल्या घरी आढळून आले नाहीत. त्यामुळे या मतदारांची पळवापळवीबाबत ते म्हणाले, की मतदारांना पळवून अनोळखी स्थळी ठेवणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे.
टीडीसीने मागील दोन पंचवार्षिकमध्ये नागरिकांसाठी अल्पदरात गृहकर्ज योजना, तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योगधंद्यांना लागणारे बीज भांडवल, महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना, तसेच ठेवीदारांसाठी आकर्षक योजना, असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे बँक नाबार्डकडून पारितोषिक मिळविण्यात यशस्वी ठरली. वैकुंठभाई मेहता हा जिल्हास्तरावरील बँकांना मिळणारा पुरस्कार मिळविण्यास वेळोवेळी पात्र ठरली असल्याने या बँकेच्या संचालक मंडळावर कोणाला विराजमान करावे, हे मतदारांना चांगले समजते. त्यामुळे ते योग्य उमेदवाराला मतदान करतील. परिणामी, मतदार पळवून काहीच उपयोग होणार नाही, असे मत बांगर यांनी व्यक्त केले.
-------------------------