मतदारांनाच विकासापेक्षा जातीय समीकरणांत रस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 04:15 AM2019-05-02T04:15:23+5:302019-05-02T04:15:40+5:30

पांडुरंग कुंभार भिवंडी लोकसभा निवडणुकीत यंदा आजी-माजी खासदारांत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. वास्तविक विकासाच्या मुद्द्यावर राजकारण अपेक्षित होते. मात्र, ...

Voters are interested in ethnic equation than development? | मतदारांनाच विकासापेक्षा जातीय समीकरणांत रस?

मतदारांनाच विकासापेक्षा जातीय समीकरणांत रस?

Next

पांडुरंग कुंभार

भिवंडी लोकसभा निवडणुकीत यंदा आजी-माजी खासदारांत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. वास्तविक विकासाच्या मुद्द्यावर राजकारण अपेक्षित होते. मात्र, येथे हा मुद्दा बाजूला सरून जातीय समीकरणे, राजकीय पक्षांचे बलस्थान आणि नाराज मतदार या तीन विषयांवर मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदान दीड टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे कपील पाटील व काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात दिसली. २०१४च्या तुलनेत या निवडणुकीत दोन लाख मतदार वाढल्याने मतदानही दीड टक्क्यांनी वाढले. या निवडणुकीत १८ लाख ८९ हजार ७८८ मतदारांपैकी १० लाख ०२हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी ५३.०७ इतकी होती. मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतु गेल्या निवडणुकीत मोदी लाटेने कपील पाटील निवडून आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करता शहापूर, मुरबाड व भिवंडी ग्रामीणचे मतदान वाढले आहे. तर एकट्या मुरबाडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ हजारांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत कपील पाटील यांना कल्याण पश्चिम व मुरबाड येथून सर्वाधिक मते मिळाली होती.

भिवंडीत मतदान फारसे वाढलेले दिसून येत नाही. येथे २०१४ च्या निवडणुकीत ५१.५८ टक्के मतदान झाले होते. तर यंदा १८ लाख ८९ हजार ७८८ मतदारांपैकी १० लाख २हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान ५३.०७ टक्के इतके झाले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत दीड टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या वर्षी ५१.५८ टक्के मतदान झाले होते.

मतदानाची टक्केवारी दीड टक्क््यांनी वाढलेली असली तरी एकूण मतदारसंख्या १ लाख २७ हजार ८४४ इतकी मोठी आहे. त्यामुळे ही मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील त्यांना विजयोत्सव साजरा करता येईल, हे गृहीत आहे. ग्रामीण भागातील आगरी, कुणबी समाजाने नेमका कोणाला कौल दिला आहे, त्याबद्दल सध्या दोन्ही उमेदवार आणि पक्षांतर्फे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतून मतदान वाढले, तर ते भाजपच्या पारंपरिक मतदारांचे असेल आणि त्याचा भाजपला फायदा होईल, असा दावा केला जातो आहे. मात्र, ते भाजपविरोधातील नकारात्मक मतदान असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे सारी भिस्त भिवंडी ग्रामीणच्या मतदारांवरच आहे.

कल्याण व मुरबाड येथे हक्काची मते असल्याने आम्ही येथे आघाडी घेणार आहोत. तर भिवंडी ग्रामीणमध्ये देखील आाम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. या निवडणुकीत किमान दीड लाखाच्या मताधिक्यांनी आम्ही निवडून येणार आहोत, याचा आम्हाला विश्वास आहे. - कपील पाटील, भाजप उमेदवार

भिवंडीसह इतर ठिकाणी आम्हाला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. कल्याण पश्चिम व बदलापूर येथे कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याची भर शहापूर, मुरबाड व मुरबाड ग्रामीणमधून भरून निघेल. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला जिंकून येण्याची खात्री आहे.
- सुरेश टावरे, काँग्रेस उमेदवार

Web Title: Voters are interested in ethnic equation than development?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.