मतदारयाद्यांवर मतदात्यांचे छायाचित्र गायब
By admin | Published: February 3, 2017 03:26 AM2017-02-03T03:26:01+5:302017-02-03T03:26:01+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी होणार आहे. त्यानुसार चार प्रभागांचा एक पॅनल असल्याने आपल्या प्रभागात कोण कोणता भाग आहे, त्याठिकाणी कोण
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी होणार आहे. त्यानुसार चार प्रभागांचा एक पॅनल असल्याने आपल्या प्रभागात कोण कोणता भाग आहे, त्याठिकाणी कोण मतदार आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या हाती घेतल्या आहेत. परंतु, त्यातील अनेक याद्यांवर किंबहुना पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध याद्यांवर मतदात्यांचे छायाचित्रच नसल्याने उमेदवारांपुढील पेच मात्र चांगलाच वाढला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असून शिवसेना-भाजपा युती मात्र तुटली आहे. त्यामुळे शेकडो उमेदवार हे महापालिकेच्या निवडणुकीत आपले नशिब आजमावणार आहेत. महापालिकेकडूनही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जात असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील आॅनलाईन पद्धतीने सुरु आहे. असे असतांना आता प्रत्येक प्रभाग हा सुमारे २० हजार ५२ हजार पर्यंतचा असल्याने या मतदात्यापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक तर होणार आहेच, शिवाय मतदाता कसा आहे, याची ओळख ही मतदार यादीत असलेल्या छायाचित्रावरुन होत असते. परंतु, पालिकेकडून छापण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये मतदात्यांचे छायाचित्रच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विकत घेतलेल्या या याद्यांचे करायचे काय असा प्रश्न या उमेदवारांना सतावू लागला आहे. उमेदवारी यादीमध्ये मतदात्याचे छायाचित्र असेल तर त्याच्या पर्यंत पोहण्यासाठी सोईस्कर ठरते. परंतु ते नसल्याने उमेदवारांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातही पालिकेकडून सध्या जी आॅनलाईन यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यातही मतदात्याचे छायाचित्र नसल्याने उमेदवारांची चिंता आणखीनच वाढली आहे.
या संदर्भात पालिकेच्या निवडणूक विभागाशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, आॅनलाईनमध्ये फाईल हेवी होत असल्याने अपलोड होण्यास उशिर होत आहे. परंतु ३ फेबु्रवारी नंतर मतदात्याचे छायाचित्रही दिसेल असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)