मतदानकेंद्रांवर स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांना पाठवण्याची सक्ती, शाळांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:05 AM2019-04-06T05:05:19+5:302019-04-06T05:05:36+5:30
पालकांचा नकार : निवडणूक अधिकाऱ्यांचे शाळांना आदेश
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवर दोन शालेय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवावेत, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवलीतील शाळांना दिले आहेत. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शाळांची अडचण होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना जुंपले जाते. त्यापाठोपाठ आता विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून घेतले जाणार असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या या अजब प्रकाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याण पश्चिमेत ७०, तर पूर्वेत ७० अशा १४० शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणारे १४ ते १७ वयोगटांतील दोन विद्यार्थी मतदानकेंद्रांवर स्वयंसेवक म्हणून पाठवावेत, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना एका बैठकीत दिली आहे. निवडणूक प्रक्रिया काय आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा यामागील उद्देश आहे. तसेच मतदानासाठी येणारे अपंग, वृद्ध मतदार यांच्या मदतीसाठीही हे स्वयंसेवक काम करणार आहेत.
निवडणूक अधिकाºयांनी शाळांना पाठवलेल्या पत्रात दोन स्वयंसेवकांचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात मुख्याध्यापकांच्या बैठकीत प्रत्येक शाळेने चार स्वयंसेवक विद्यार्थी पाठवावेत. तसेच विद्यार्थी पाठवणे सक्तीचे आहे, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, पत्र आणि तोंडी आदेश यात तफावत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनामध्ये याविषयी संभ्रमावस्था आहे.
अधिकाºयांनी बैठकीत विद्यार्थ्यांना मानधन दिले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, त्याचा लेखी आदेश कुठेही दाखवलेला नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मतदानकेंद्रावर स्वयंसेवक म्हणून नेमा अथवा त्यांची मदत घ्या, असा आदेश निवडणूक आयोगाकडून काढला गेला आहे का, याची विचारणाही शाळांनी अधिकाºयांकडे केली. त्यावर अधिकाºयांकडे निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत नव्हती. त्यामुळे त्यांना ती देता आली नाही.
पालकांची इच्छा नसल्यास विद्यार्थ्यांनी येऊ नये
निवडणूक क्षेत्रीय अधिकारी दिलीप शिंदे यांच्या स्वाक्षरीने शाळांना पत्र दिले गेले आहे. त्यामुळे याबाबत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, पालकांचा विरोध असेल तर त्या पाल्यांनी आले नाही तर चालेल. हा जबरदस्तीचा मामला नाही. स्वयंसेवकाचे काम करणाºया विद्यार्थ्याला मानधन दिले जाईल, असे तहसीलदारांनी मुख्याध्यापकांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती नाही.