वाण्याचा पाडा, नांदा कातकरी वाडीला पाणीटंचाईच्या झळा, भिवंडी तालुक्यातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:17 AM2019-05-08T01:17:13+5:302019-05-08T01:17:59+5:30
भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाण्याचा पाडा, नांदा कातकरी वाडी या आदिवासी - कातकरी वस्तीमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
- रोहिदास पाटील
अनगाव - भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाण्याचा पाडा, नांदा कातकरी वाडी या आदिवासी - कातकरी वस्तीमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. वाण्याचा पाडा येथील विहीर कोरडीठाक पडली असल्याने हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर जागरण करावे लागते आहे. तर नांदा कातकरी वाडीमध्ये असलेल्या बोरवेलला पाणीच येत नसल्याने येथील महिलांना लांबवरून पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि शंभर टक्के पेसा अंतर्गत येणाºया लाखिवली ग्रुप ग्रामपंचायतीतील या पाड्यांना दरवर्षी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. शंभर टक्के आदिवासी कातकरी लोकवस्ती असलेल्या या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या पाड्यातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. भिवंडी पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका यांना बसतो आहे. पाणी टंचाईच्या तक्र ारी ग्रामसेवक भाऊ जाधव, पाणीपुरवठा शाखा अभियंता उत्तम आंधळे, प्रकाश सांसे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाण्याचा पाडा आणि नांदा कातकरीवाडीत सहाशेच्यावर लोकसंख्या आहे. येथे पाणीटंचाई भेडसावत असून महिलांना उन्हातान्हात भटकंती करावी लागते आहे. शासनाच्या योजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचे येथील आदिवासींनी सांगितले. येथे सोयीसुवधिांची वानवा आहे. नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करून शासनाने नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या पाड्यांमधील पाणीटंचाई संबंधीचा अहवाल ग्रामसेवकांकडून मागवला आहे. टंचाई दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - इंद्रजीत काळे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी
या पाड्यामध्ये पाहणी केली असता तीव्र पाणी टंचाई असल्याचे जाणवले. या विषयी येथील महिलांनी श्रमजीवी संघटनेच्या वतीने तक्र ारी केल्या आहेत.
- यशंवत भोईर, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते
श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली गटविकास अधिकाऱ्यांची भेट
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्रपाणी टंचाई आहे. सहा महिन्यांपूर्वी गावपाड्यांतील पाणीटंचाईची नावासह निवेदन देण्यात आले होते. तरीही पाणी पुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांची भेट घेऊन पाणीटंचाई संबंधी चर्चा केली. पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्कर यांना सहा महिन्यांपूर्वी संघटनेने गावपाड्यातील पाणीटंचाई संबंधी निवेदन दिलेले असताना त्यावर काय उपाय योजना केल्या असा प्रश्न केला. मात्र, यावर ते निरुत्तर झाले. पाणी टंचाई संबधी ‘लोकमत’मध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. तरीही त्यावर तात्काळ उपाययोजना का होत नाही, याचा जाब बाळाराम भोईर, दत्तात्रय कोलेकर यांनी विचारला. तसेच पाणीटंचाई दूर न केल्यास अधिकाºयांना सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिला. यावर पाणी टंचाई दूर करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी शहर तालुका अध्यक्ष सागर देसक, सचिव मोतीराम नामकुडा, जयाताई पारधी, संगीता भोमटे, केशव पारधी, यशवंत भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मानखिंड गावाला टंचाईचे चटके
- जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. जून महिन्यातही पाऊस वेळेवर पडेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या किती वाढेल हे काही सांगता येत नाही. तालुक्यातील मानखिंड हे गाव चारही बाजूने डोंगर टेकड्यांच्या सहवासातील. येथील लोकसंख्या ७०० ते ८००. येथे विहिरी कायम भरलेल्या असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूजल पातळी खालावल्याने विहिरी आटल्या. परिणामी, गावात टंचाई निर्माण झाली.
गावाला टँकरने पाणी पुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव दिला आहे. मे महिना आणि जूनमध्ये पाऊस सुरळित सुरू होईपर्यंत या गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गाव पाडे हे डोंगर दºयांमध्ये वसलेले असल्याने तेथे टँकर नेणे म्हणजे चालकांची कसरत ठरणार आहे.
मानखिंड या गावाचा टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव आला असून असून मान्यतेसाठी तो पुढे पाठवण्यात आला आहे.
- किशोर गायकवाड, कनिष्ठ लिपिक, पाणी पुरवठा विभाग
भिवंडीतील पाणीप्रश्न पेटला
अनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने सातत्याने मांडले. त्याचे पडसाद भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले असतानाच या प्रकरणी श्रमजीवी संघटना आक्र मक झाली आहे. मंगळवारी श्रमजीवीच्या पदाधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घातला. त्यानंतर बुधवारी ग्रामसेवक पाणीपुरवठा विभाग संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत पंचायत समितीच्या सभागृहात बैठक बोलावली असून तेथे सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी दिले.
यासाठीच बुधवारी बैठक बोलावली असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी ७५ बोरवेल मंजूर झाल्याची माहिती गटविकास अधिकाºयांनी दिली.
भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. निवासी नायब तहसीलदार संदीप आवारी, बांधकाम उपअभियंता गीते, पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे, संगीता भोमटे, जया पारधी, केशव पारधी, सागर देसक, मोतीराम नामकुडा उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरल्याने उद्याच्या बैठकीत जर योग्य मार्ग निघाला नाही तर संघटना आक्र मक भूमिका घेणार असल्याची माहिती अशोक सापटे यांनी ‘लोकमत’ला दिली.
सहा महिन्यांपूर्वी गावपाड्यांमधील पाणीटंचाईसंबंधी निवेदन दिले असूनही त्यावर पाणीपुरवठा विभाग अधिकाºयांनी उपाययोजना का केल्या नाहीत? असा सवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी उपस्थित केल्याने अधिकारी निरुत्तर झाले.