परिवहनच्या ताफ्यातील ९ व्होल्वो बसेस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी वागळे आगारात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:17 PM2018-12-12T17:17:47+5:302018-12-12T17:20:47+5:30
एकीकडे ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असतांना परिवहनच्या बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याने त्याचा भुर्दंड परिवहनलाच सोसावा लागत आहे. व्होल्वोच्या ९ बसेस मागील ९ दिवसापासून बंद असून दुरुस्तीसाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी जाणार आहे.
ठाणे -ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० व्होल्वो बसेसपैकी ९ बसेस मागील १५ दिवसापासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिवसाला परिवहन सेवेचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान होत आहे. या बसेस रस्त्यावर उतरण्यास आणखीन आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रांनी दिली.
सध्या ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकुलीत ही बस सेवा सुरु आहे. यातील एका बसचे सरासरी दिवसाचे उत्पन्न हे १० हजारांच्या आसपास आहे. या मार्गावर २६ वातानुकुलीत बसेस धावतात त्याव्यतिरिक्त ४ व्होल्वो बसेस ठाणे ते मंत्रालय अशा धावत आहेत. ठाणे ते बोरीवली मार्गावर या बसेस वाढवाव्यात अशी या मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे. परंतु असे असतांना मागील १५ दिवसापासून केवळ २१ बसेसच रस्त्यावर धावत असून उर्वरीत ९ बसेस वागळे आगारात दुरुस्ती उभ्या आहेत. या बसेसपैकी काही बसेसच्या काचा फुटल्या असून काही बसेस सर्व्हीसींगसाठी उभ्या आहेत. परिणामी या बसेस रस्तावर धावत नसल्याचे परिवहनचे दिवसाला सुमारे एक लाखांचे नुकसान होत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात जवळपास १५ लाखांचे नुकसान परिवहनला सहन करावे लागले आहे. त्यात या बसेस दुरुस्तीसाठी आणखी ९ दिवस लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.