खडसे समर्थकांचे वेट ॲण्ड वॉच! राष्ट्रवादीत गोंधळ, प्रवेशाबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:45 AM2020-10-23T10:45:35+5:302020-10-23T10:46:42+5:30
खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते होते, परंतु त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
प्रशांत माने
कल्याण : भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये खडसे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खडसे यांच्यासह त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात आढावा घेतला असता काही समर्थकांनी खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची जोरदार तयारी केली आहे, तर काहीजण मात्र वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत असलेला सावळागोंधळ पाहता ते राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते होते, परंतु त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. अपमानास्पद वागणुकीबाबत त्यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर उघडपणे भाष्य करत भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, काही समर्थकांनी वेट ॲण्ड वॉचची घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादीत गेल्यावर खडसेंना वरिष्ठ पातळीवर मोठे पद मिळेल, अशी आशा समर्थकांना आहे. परंतु, कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीची स्थिती आलबेल नाही. त्यातच, केडीएमसीची येऊ घातलेली निवडणूक पाहता समर्थकांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सध्यातरी त्यांचे मन तयार नाही.
नाथाभाऊ यांचा पक्षप्रवेश होऊ दे. ते स्थिरावल्यावर पुढचा निर्णय घेऊ, अशी भूमिका काही समर्थकांनी घेतली आहे. तर, काहींनी मात्र सध्यातरी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.
माळी राष्ट्रवादीच्या वाटेवर
खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्यासोबत कोणीही आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. परंतु, कल्याणमधील त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे. खडसे यांचे कट्टर समर्थक आणि भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळी हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. माळी हे कल्याणमधील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष आहेत. प्रवेश करताना या संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, असंघटित कामगार तसेच खान्देशातील काही मंडळी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती माळी यांनी दिली.