‘सिंहगड’ला ठाण्यात मार्चअखेरपर्यंत थांबा
By admin | Published: January 11, 2017 07:11 AM2017-01-11T07:11:00+5:302017-01-11T07:11:00+5:30
पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसचा ठाणे रेल्वे स्थानकातील ‘आॅपरेशनल’ थांबा ३१ मार्चपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती कर्जत येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी दिली.
डोंबिवली : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसचा ठाणे रेल्वे स्थानकातील ‘आॅपरेशनल’ थांबा ३१ मार्चपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती कर्जत येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी दिली. या थांब्यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता.
सिंहगड एक्स्प्रेस मुंबईहून पुण्याला जाताना ठाण्यात थांबते. मात्र, पुण्याहून मुंबईला येताना ती ठाण्यात थांबत नाही. त्यामुळे हा थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तात्पुरता थांबा मिळाला. तो आधी जून तर नंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीनंतर पुढे काय होणार, असा प्रश्न असंख्य प्रवाशांना होता. पण आता मार्चअखेरीपर्यंत थांब्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी
पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसला ठाण्यात आॅपरेशनल थांबा मिळाला आहे. तो अधिकृत व कायमस्वरूपी थांबा मिळावा, या मागणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे ओसवाल म्हणाले. या थांब्यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थाही ओसवाल यांना सहकार्य करणार आहे.