विकासमंदिर शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:59 AM2018-08-05T02:59:42+5:302018-08-05T02:59:59+5:30
एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना शहरातील विकासमंदिर शाळेने डिजिटलकडे झेप घेतली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना शहरातील विकासमंदिर शाळेने डिजिटलकडे झेप घेतली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करावी लागली आहे. दुपटीपेक्षा जास्त मुले एका तुकडीत आहेत. अधिक शिक्षक देण्याविषयी पाठपुरावा करूनही सरकार देत नसल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष व्ही.व्ही. पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी विकासमंदिर ही शाळा सुरू केली. गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी ९० टक्के झोपडपट्टी असलेल्या परिसरात शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. बालवाडीच्या मुलांकडून बाराखडी, शब्दरचना, १ ते १०० पर्यंत अंक लिहितावाचता येतील, त्याच मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो.
बालवाडीत चक्क १९२ मुलांचा पट आहे. तर, पहिलीच्या एका तुकडीत ७५ मुले आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मुले असून माध्यमिक तुकड्यांतील मुलांची संख्याही ७५ पेक्षा जास्त आहे. शहरातील बहुसंख्य शाळांना मुलांअभावी घरघर लागली असताना, विकासमंदिर शाळेत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी असल्याचे पाटील म्हणाले. मुख्याध्यापक वसुधा डोंगरे, योगेश पाटील यावेळी उपस्थित होते.
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण शाळा डिजिटल करण्याची संकल्पना आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गात व बाहेर सीसीटीव्ही पाच वर्षांपूर्वी लावले आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी चांगले आहे, त्यांना गणित, विज्ञान इंग्रजीतून शिकवले जाते. जूनमध्येच विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांच्या पाया पडून येण्याची शपथ दिली जाते.
>प्रत्येक वर्गात आदर्श विद्यार्थ्यांची निवड
शाळेच्या विविध उपक्रमांतील भाग, अभ्यास, वर्तणूक, स्वच्छता आदी निकष लावून प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीची नोंद ठेवत त्यांची समस्या शिक्षक, पालकव विद्यार्थी एकत्र येऊन सोडवतात.