ड्रंकड्राइव्हच्या हॅट्ट्रिकची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:58 PM2019-12-26T23:58:49+5:302019-12-26T23:58:53+5:30
मद्य पिऊन गाडी चालवू नका : शहरपोलिसांचे ठाणेकरांना आवाहन
ठाणे : सरते आणि येणारे वर्ष अपघातविरहित व्हावे, यासाठी वाहतूक शाखेकडून नेहमीच खबरदारी घेतली जाते. मागील दोन वर्षांत मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात ठाणे शहर वाहतूक शाखेने यंदाही चांगलीच कंबर कसली होती. वर्षभर मद्यपींवर कारवाई सुरू असताना ३१ डिसेंबर रोजी राबवण्यात येणाºया विशेष मोहिमेत मुंबईपेक्षा ठाण्यात सर्वाधिक मद्यपी मिळून आले होते. यामुळे देशात चर्चेत राहिलेल्या ठाणे शहर वाहतूक शाखेने यंदाही सर्वाधिक ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस करून हॅट्ट्रिक साधण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांनी सावधान राहून वाहन स्वत: न चालविता चालक सोबतीला ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरांत जल्लोषमय वातावरणाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच, शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे. ३१ डिसेंबर २०१७ ला १,१५६ आणि ३१ डिसेंबर २०१८ रोजी २,०७१ के सेस नोंदवल्या गेल्या असून यंदाही त्यापेक्षा जास्त केसेस नोंदवण्याचा संकल्प करून वाहतूक शाखेने आयुक्तालय कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या चौकांत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये ८० पोलीस अधिकारी व ३०० ते ३५० पोलीस कर्मचाºयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दंडाबरोबरच परवाना होणार निलंबित
नियम मोडणाºयांवर कारवाई करताना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार असून चालकाचा परवानाही निलंबित केला जाणार आहे. यावेळी वाहन चालवणारा मद्य पिऊन असेल आणि गाडीत बसलेले इतर मद्य पिऊन असो वा नको, त्यांच्याकडून चालकाला प्रोत्साहित केल्याप्रकरणी प्रत्येकी दोन हजार दंड केला जाणार आहे. तसेच परवाने निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर ते आरटीओकडे पाठवतात.
मद्यपींवर कारवाईसाठी ५४ मशीन : वाहतूक शाखेंतर्गत एकूण १८ उपशाखा आणि ३५ पोलीस ठाण्यांतर्गत ५४ टीम तयार केल्या आहेत. एका टीममध्ये एक अधिकारी आणि तीन कर्मचारी असणार आहेत. तसेच त्या उपशाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे मद्यपींच्या तोंडाच्या तपासणीसाठी प्रत्येकी तीनचार मशीन तसेच काही मशीन कंट्रोल रूमलाही अतिरिक्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील दोन वर्षांच्या धर्तीवरच यंदाही वाहतूक पोलिसांद्वारे मद्यपींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच २९, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानंतर कोणीही गाडी चालवू नये. वाहन चालवण्यासाठी त्यांनी आपल्या सोबतीला वाहनचालक ठेवावा.
- अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक ठाणे शहर