चार महिन्यांपासून प्रतीक्षाच, रेल्वेवर एमएसआरडीसीचा लेटलतिफीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:56 AM2018-08-05T02:56:17+5:302018-08-05T02:57:21+5:30
कल्याण-शीळ महामार्गावर ब्रिटिशांनी १०४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पत्रीपुलाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावर ब्रिटिशांनी १०४ वर्षांपूर्वी बांधलेल्या पत्रीपुलाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यासंदर्भात ब्रिटिश सरकारने १९९६-९७ मध्ये केडीएमसीला पत्र पाठवून माहिती दिली आहे, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, हा पूल एमएसआरडीसीअंतर्गत येत असून त्याचे डांबरीकरण करण्याखेरीज त्यांनी विशेष डागडुजी केलेली नाही. तर, नवीन पूल बांधण्याकरिता अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव चार महिन्यांपासून मध्य रेल्वेकडे प्रलंबित आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.
जुना पत्रीपूल धोकादायक असल्याचे पत्र आयआयटीने मध्य रेल्वेला दिले आहे. त्यामुळे हा पूल तत्काळ वाहतुकीस बंद करावा आणि पाडावा, असे रेल्वेने केडीएमसीला कळवले आहे. केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी म्हणाले की, पत्रीपूल एमएसआरडीसीच्या अखत्यारित येतो. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या सूचनेची माहिती एमएसआरडीसीला तातडीने पत्राद्वारे कळवण्यात येत आहे. नवीन पत्रीपूल १९९९-२००० मध्ये युती सरकारच्या काळात बांधून पूर्ण झाला. जुना पूलही वापरात असल्याने नवीन पुलावरून एकावेळी दोन मोठी वाहने जाऊ शकतील, एवढाच रुंद बांधण्यात आला. जुन्या पुलावरून शीळहून कल्याणकडे जाणारी, तर नवीन पुलावरून कल्याणहून शीळच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू होती. मात्र, आता शीळहून कल्याणकडे जाणारी अवजड वाहने जुन्याऐवजी नवीन पुलावरून वळवण्यात आली आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी जुना पत्रीपूल सुरू आहे. वाहतूकव्यवस्थेतील या बदलांमुळे पत्रीपूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ लागली आहे.
एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे म्हणाले की, कल्याण-शीळ मार्गासह भिवंडी-माणकोलीपर्यंतचा रस्ता चारवरून सहापदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी २१२ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यामध्ये लोढा, पत्रीपूल, तसेच भिवंडी-माणकोलीफाटा येथील पुलांचाही प्रस्ताव आहे. एमएसआरडीसी पत्रीपुलावर डांबरीकरण, खड्डे भरणे आदी कामे सातत्याने करत आहे. पुलाखालचा भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारित होता. त्याची देखभाल ते करत होते. आता तेथे नवा उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात रेल्वे आणि आमच्या विभागाच्या अधिकाºयांनी चारपाच वेळा पाहणी केली. बैठकाही झाल्या आहेत. पुलाच्या मंजुरीसाठी त्याची लांबी, उंची याबाबत पाहणी अहवाल (जेईडी) रेल्वेकडे साधारण चार महिन्यांपासून पडून आहे. त्यानुसार, त्यांच्याही चार प्रमुख विभागांच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, मंजुरी पुढील आठवड्यात मिळणार आहे. त्यानंतर, तातडीने अंतिम आराखडा मंजूर करून तत्काळ पूल बांधण्याचे काम हाती घेतले जाईल, असे बोरडे यांनी स्पष्ट केले.
>हलक्या वाहनांचीही वाहतूक थांबवा : धोकादायक बनलेल्या जुन्या पत्रीपुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहने नवीन पुलावरून वळवली आहेत. परंतु, वेगात आलेली वाहने जुन्या पुलाच्या दिशेने येतात. त्यामुळे ती हाइट बॅरिअरला (लोखंडी कमान) धडकतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक बांदेकर म्हणाले. जुन्या पुलावरून जाणाºया हलक्या वाहनांचीही वाहतूकही तातडीने थांबवावी, अशी मागणी ठाण्यातील वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पत्राद्वारे करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता महाव्यवस्थापकांसमवेत ते बैठकीत व्यस्त असल्याचे म्हणाले.
>आम्हाला पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्याचे कोणत्याही प्रकारचे अध्यादेश मिळालेले नाहीत. त्यामुळे या पुलावरून सध्या तरी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. परंतु, भविष्यात जर हा पूल बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले, तर संबंधित विभागानेच वाहतूकविषयी पर्याय उपलब्ध करून द्यावेत. या वाहतुकीमुळे पोलिसांचीच कोंडी झाली आहे.
- अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक (वाहतूक)