प्रसूतिगृह उदघाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: April 19, 2016 02:03 AM2016-04-19T02:03:38+5:302016-04-19T02:03:38+5:30
शहरातील नूतनीकरण केलेले सरकारी प्रसूतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सात कोटींतून रुग्णालयाचे नूतनीकरण व कामगार निवास इमारत बांधली
उल्हासनगर : शहरातील नूतनीकरण केलेले सरकारी प्रसूतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सात कोटींतून रुग्णालयाचे नूतनीकरण व कामगार निवास इमारत बांधली. ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे होऊनही कर्मचारी, डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येने रुग्णांची गैरसोय होत आहे. महिन्याला ५०० पेक्षा जास्त बालकांचा जन्म येथे होतो, अशी माहिती अधीक्षक डॉ. नरसिंग इंगळे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नंबर-४ परिसरातील सरकारी प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करून त्याचा विस्तार केला आहे. ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे झाले असूनही डॉक्टर व इतर कर्मचारी तेवढेच आहेत.
रुग्णालयात कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीणमधून गर्भवती येथे उपचारासाठी येतात. दरमहा ४०० ते ४५०, तर वर्षाला पाच हजारांपेक्षा जास्त बालके येथे जन्म घेतात, अशी नोंद आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच वॉर्डांची संख्याही दुप्पट झाली आहे.
राज्य सरकारने बांधकाम विभागांतर्गत प्रसूतिगृहाचे नूतनीकरण सुरू केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तीन मजली इमारत बांधली आहे. नूतनीकरणाचे काम सुरू असताना शस्त्रक्रिया विभाग सोडून इतर विभाग सुरू ठेवण्याची किमया बांधकाम विभागाने साधली आहे.
त्यातच एक मजला नव्याने बांधला असून अद्ययावत यंत्रसामग्री पुरवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निवासी इमारत बांधून पूर्ण झाली असून नूतनीकरणाचे काम झाले आहे. प्रसूतिगृहाचे उद्घाटन झाल्यावर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.आर. सूर्यवंशी यांनी प्रसूतिगृह रुग्णालयाच्या ताब्यात दिल्याचे सांगून उद्घाटन बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तर, नूतनीकरणाचे बाह्यकाम झाल्यावर उद्घाटनाबाबतची माहिती वरिष्ठांना देणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. इंगळे यांनी दिली.
(प्रतिनिधी)