राज्यातील पाणथळींना ‘रामसार’ यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:53 AM2017-11-27T06:53:05+5:302017-11-27T06:53:18+5:30
महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते.
ठाणे : महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. मात्र आपल्याकडील अनेक पाणथळ जागांचे योग्य संवर्धनच झालेले नाही. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले असून, आता यासाठी पक्षीमित्र-संघटनांनी एकत्र येऊन शासनाकडे पत्र देण्याची आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञ, ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. राजू कसंबे यांनी व्यक्त केले.
महाराष्टÑ पक्षीमित्र संघटना आणि होपर नेचर ट्रस्ट आयोजित ३१ वे महाराष्टÑ पक्षीमित्र संमेलन गडकरी रंगायतन येथे आयोजिले आहे. या संमेलनाच्या दुसºया दिवशी महाराष्टÑाचे रामसार आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व या विषयावर सत्र रंगले होते. त्यावेळी कसंबे बोलत होते.
भारतातील केवळ २६ जागा रामसार यादीत आहेत. नांदूर-मध्यमेश्वर, जायकवाडी, लोणार, उजनी, ठाणे खाडी अशा सुमारे ७ पाणथळ जागा रामसार यादीत याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका नावाला अनुमोदनही मिळाले आहे. यातील ठाणे खाडीसह एखाद दुसºया पाणथळ जागेचे संवर्धन झालेले आहे. मात्र इतर जागांचे योग्य संरक्षण करण्यात आलेले नाही. किमान २० हजार पक्षी तेथे सातत्याने मिळावेत इतकी प्राथमिक अट त्यासाठी आहे. देशातील तर २०० पेक्षा
अधिक जागा त्या यादीत बसण्यायोग्य आहेत. त्याचा अभ्यास करण्याची आणि त्या पाणथळ जागांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखादी पाणथळ जागा रामसार साईटस् म्हणून घोषित झाल्यावर त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येत
नाही, अशी माहिती डॉ. कसंबे यांनी यावेळी दिली.
सारस पक्ष्याच्या संवर्धनाबाबत दिली माहिती
याच सत्रादरम्यान गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी जिल्ह्यातील सारस आणि त्यांच्या संवर्धनासाठीची मोहिम याविषयी माहिती दिली.
मिलिंद गाथाडे यांनी पाय किंवा पंख तुटलेल्या पक्ष्यांवर कसे उपचार केले जातात याची माहिती देऊन पाय तुटलेल्या करकोच्यावर आधारीत चलचित्रफित दाखविली.
तर पक्षीमित्र प्रेमसागर मेस्त्री यांनी बर्ड रेस्क्यू या विषयावर माहिती दिली. तसेच पक्ष्यांशी संबंधित इतर काही माहिती पक्षीमित्रांनी दिली.