स्वाइन लसींसाठी अजून महिनाभराची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:36 AM2017-07-21T03:36:57+5:302017-07-21T03:36:57+5:30
एकीकडे ठाणे जिल्ह्याला स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून अजूनही स्वाइन फ्लू या आजारावरील रोगप्रतिबंधात्मक लस जिल्ह्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे ठाणे जिल्ह्याला स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून अजूनही स्वाइन फ्लू या आजारावरील रोगप्रतिबंधात्मक लस जिल्ह्यातील एकाही शासकीय रुग्णालय किंवा महापालिकांच्या रुग्णालयात उपलब्ध झालेली नाही. ती येत्या काही दिवसांत शासनाकडून उपलब्ध होईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ती लस आॅगस्ट महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूबाधित रुग्णांची संख्या ५७९ घरात पोहोचली आहे. त्यातच, आतापर्यंत जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दगावलेल्या रुग्णांची संख्याही २७ वर गेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिकेच्या हद्दीत उपचारार्थ दाखल झाले असून रुग्ण दगावण्याची संख्याही ठाणे महापालिकेच्या हद्दीत जास्त आहे. त्यातच, महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्यापाठोपाठ अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनाही स्वाइनची लागण झाली आहे. परंतु, तरीही प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जुलै महिन्यात स्वाइन फ्लू झपाट्याने वाढल्यावर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलवली होती. त्या वेळेस फ्लूची रोगप्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याची बाब उघड झाल्यावर त्यांनी तातडीने सर्व महापालिकांना आपापल्या स्तरावर लस खरेदी करण्याचे तसेच जनजागृती करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले होते. ते देऊन जवळपास १५ दिवस उलटल्यानंतरही जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, रुग्णालय आवारात स्वाइन फ्लूच्या जनजागृतीबाबत पोस्टर लावण्यात आल्याचे दिसते.
प्रादुर्भाव वाढतोय तो उंदीर, घुशींच्या मलमूत्रामुळे!
ठाणे : स्वाइनच्या वाढत्या प्रादुर्भावावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी जोरदार चर्चा सुरू असताना हा आजार उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रामुळे होत असल्याचे प्रतिपादन सेनेच्या एका डॉक्टर नगरसेविकेने केल्याने सभागृह स्तब्ध झाले. यामुळे स्वाइन फ्लू नव्हे तर लेप्टो आजार होतो, हे समजावण्याचा प्रयत्न स्वत: महापौरांनी त्यांना इशाऱ्याद्वारे केला. मात्र, तो न समजल्याने नगरसेविकेने सदस्यांच्या ज्ञानात ‘भर’ घालण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. ठाणे शहरात काही महिन्यांपासून स्वाइनचे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा जवळपास तीनशेपर्यंत पोहोचला असून आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाइनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. स्वाइनची लागण झालेल्या रु ग्णांना लवकर औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. चर्चेदरम्यान सेना नगरसेविका डॉ. शिल्पा वाघ यांनी उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रामुळे स्वाइनची लागण होत असल्याचा दावा केला. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी इशारा करून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न समजल्याने डॉ. वाघ यांनी एक पाऊल पुढे जाऊन शहरातील उंदीर व घुशींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी असून त्यामुळे त्रास होत असल्याचे त्या म्हणाल्या. अखेर, महापौरांनी स्वाइन फ्लू आजार नेमका कशामुळे होतो, याबाबत माहिती देण्याची सूचना प्रशासनाला केली. उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रामुळे नव्हे, तर विषाणूंच्या संसर्गामुळे स्वाइन होत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी.केंद्रे यांनी दिली. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो रोखण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, स्वाइनबाबत सभागृहामध्ये केलेले वक्तव्य केवळ अनवधनाने केले होते, असे डॉ. शिल्पा वाघ यांनी लोकमतला सांगितले. याचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब आहे. ही चिंता व्यक्त करताना अनवधानाने चुकीचा संदर्भ देण्यात आला, असे त्या म्हणाल्या.
- स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी कंपन्यांकडे लसींचा तुटवडा आहे. तीन आठवड्यांपूर्वीच्या लसींचा उपचारासाठी फारसा फायदा होत नाही. या आजाराचे रुग्ण देशभरात वाढल्याने कंपन्यांकडे लसींचा तुटवडा असून त्यामुळेच त्या लवकर उपलब्ध करून देणे शासनाला शक्य होत नसल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी सांगितले. महापालिकेने अत्यावश्यक सेवा म्हणून लसींची तत्काळ खरेदी करावी आणि कार्योत्तर प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहासमोर मांडण्याचा ठराव यावेळी नगरसेवकांनी घेतला.