शववाहिनीच्या लोकार्पणासाठी खासदारांची प्रतीक्षा
By admin | Published: June 20, 2017 06:22 AM2017-06-20T06:22:27+5:302017-06-20T06:22:27+5:30
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची जुनी शववाहिनी रस्त्यात कधीही बंद पडत होती. नव्या शववाहिनीचा प्रस्ताव तयारदेखील करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची जुनी शववाहिनी रस्त्यात कधीही बंद पडत होती. नव्या शववाहिनीचा प्रस्ताव तयारदेखील करण्यात आला. या शववाहिनीला खासदार कपिल पाटील यांनी १२ लाखांचा खासदार निधी दिला. बदलापूर पालिकेत ही नवी शववाहिनी वाहनताफ्यात दाखलदेखील झाली. मात्र, खासदारांच्या हस्ते त्या गाडीचे लोकार्पण न झाल्याने ही शववाहिनी तशीच पडून आहे. त्यामुळे नवी शववाहिनी असतानादेखील जुनीच शववाहिनी वापरण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या वाहनताफ्यातील जुनी शववाहिनी नादुरुस्त झालेली आहे. पर्यायी वाहन नसल्याने त्याच गाडीची दुरुस्ती करून ते वाहन चालवले जात आहे. अनेक वेळा अंत्ययात्रेसाठी या शववाहिनीचा वापर करत असताना रस्त्यातच गाडी बंद पडण्याचे प्रकार घडले आहे. एवढेच नव्हे तर अनेकदा अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या दु:खी कुटुंबीयांनाच या गाडीला धक्का मारून गाडी सुरू करण्याची वेळ आली होती. या सर्व प्रकारानंतर खासदार निधीतून नव्या गाडीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी १२ लाख रुपये खासदार कपिल पाटील यांनी दिले. ही नवी गाडी तयार होऊन पालिकेच्या वाहनताफ्यात दाखलदेखील झाली आहे.
शववाहिनी ही एक सेवा असल्याने त्याचा वापर लागलीच होणे गरजेचे होते. मात्र, राजकीय पुढाऱ्यांना सेवेपेक्षा त्या सेवेतून आपली प्रसिद्धी कशी होईल, याचाच विचार जास्त आहे. शववाहिनीच्या बाबतीतही हेच झाले. नवी कोरी शववाहिनी वापराविना पडून राहिली आहे. मात्र, त्या शववाहिनीचा लोकार्पण सोहळा खासदारांच्याच हस्ते करण्याचा हट्ट स्थानिक नेत्यांनी ठेवल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. केवळ लोकार्पण झाले नाही, म्हणून लोकांना शववाहिनी पुरवण्यात येत नसल्याचे पालिकेच्या व्यवस्थेबाबत आणि स्थानिक नेत्यांच्या हट्टाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. तर, दुसरीकडे खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेला तत्काळ ही शववाहिनी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ही शववाहिनी खरेदीसाठी २०१४ मध्ये निधी दिला होता. पालिकेने शववाहिनी खरेदी केल्याचे मला कळवलेदेखील नव्हते. दोन दिवसांपूर्वी मला शववाहिनीच्या लोकार्पणासाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार, २१ जून रोजी वेळ दिलेली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांना विचारले असता त्यांनी येत्या दोन दिवसांत ही गाडी सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.