खासदारांचे दत्तक सापगाव निधीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:46 PM2018-10-31T22:46:37+5:302018-10-31T22:46:46+5:30
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. कपिल पाटील यांनी दत्तक घेतलेले सापगाव हे सध्या खासदार निधीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
वासिंद : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. कपिल पाटील यांनी दत्तक घेतलेले सापगाव हे सध्या खासदार निधीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खासदार ग्राम दत्तक योजनेत’ खा. कपिल पाटील यांनी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर तालुक्यातील सापगाव हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावासाठी अद्यापही खा. फंडातील कुठलाच निधी खर्च केला नसल्याचे दिसून येते. खासदारांच्या शिफारशीनुसार येथे जेएसडब्ल्यू (जिंदाल) या कंपनीच्या सीआरएस फंडातून रस्त्याचे फक्त एकच काम करण्यात आले आहे. येथे खासदारांच्या वैयक्तिक निधीतून अद्याप एकही काम झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दत्तक गाव खासदारांचे, भरीव निधी आमदारांचे :सध्या येथे आमदार निधीतून रस्ते, साकव, घाट, शाळा, अंगणवाडी दुरु स्ती अशी ८५ लाखांची कामे पूर्ण, तर पर्यटनस्थळ, मंगल कार्यालय, रस्ते यासाठी ४२ लाखांची कामे मंजूर असून इतर कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे खासदारांनी दत्तक घेतलेल्या या गावात खासदार निधी वापरल्याचे दाखवून द्यावे, असे आमदार पांडुरंग बरोरा यांनी म्हटले. यासंदर्भात खासदार कपिल पाटील व स्वीय सहायक राम माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. - भास्कर जाधव, शहापूर तालुकाध्यक्ष भाजपा