ठामपाचे कर्मचारी सानुग्रहच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 24, 2015 11:29 PM2015-10-24T23:29:30+5:302015-10-24T23:29:30+5:30
मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांमध्ये भरगच्च असे सानुग्रह अनुदान मंजूर झाले असताना अद्यापपर्यंत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान मिळणार
ठाणे : मुंबई, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांमध्ये भरगच्च असे सानुग्रह अनुदान मंजूर झाले असताना अद्यापपर्यंत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती सानुग्रह अनुदान मिळणार अथवा मिळणार नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता सानुग्रह अनुदानासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेनंतर ठाणे महापालिकेचा क्रमांक लागतो. मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना १३ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेने १४ हजार आणि आर्थिक डबघाईत असलेल्या उल्हासनगर महापालिकेने तर १४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. असे असतानाही ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत अद्यापही राजकीय नेते, युनियन आणि पालिका आयुक्तांची बैठक झालेली नाही. पालिकेची आर्थिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक सुस्थितीत आली असतानाही याबाबत प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, म्युनिसिपल लेबर युनियनने पालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी एकत्रित वेतनावरील, ठोक पगारावरील कर्मचारी यांच्यासह, जिद्द शाळा, बालवाड्यांमधील कर्मचारी, शिक्षण विभाग, मलनि:सारण विभाग, व इतर विभागांतील काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनाही २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.
निर्णय लवकरच होणार
येत्या सोमवारी युनियनने कर्मचाऱ्यांची बैठक सायंकाळी ५.३० च्या सुमारास आयोजित केली आहे. त्यानंतर, पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. यासंदर्भात महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.