ठाण्यात खड्ड्यांनी अडविली वाहनांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:44+5:302021-09-15T04:46:44+5:30
ठाणे : ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून, अशीच काहीशी परिस्थिती पूर्व द्रुतगती मार्गावरही आहे. या मार्गावरदेखील मोठ्या ...
ठाणे : ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून, अशीच काहीशी परिस्थिती पूर्व द्रुतगती मार्गावरही आहे. या मार्गावरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. परिणामी, महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी माणकोलीपासून ठाणेपर्यंतचे पाऊण तासाचे अंतर कापण्यासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
पावसाळा आणि ठाणे शहरातील रस्त्यावरील खड्डे हे जणू समीकरणच झाले आहे. पावसाळा आला की, ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांविरोधात भाजपने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शहरातील खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश महापौर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजविण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनानेदेखील केला होता. मात्र, तो फोल ठरला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील नितीन कंपनी, तीनहातनाका, तसेच येथील सेवा रस्ता, कळवा, नौपाडातील मल्हार सिनेमाजवळील रस्ता, वागळे इस्टेट भागातील बहुतेक रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सामान्य ठाणेकरांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.