कल्याणमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटामुळे आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:06 PM2018-12-21T17:06:32+5:302018-12-21T17:09:05+5:30
काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण होरपळून गंभीर जखमी झाले.
कल्याण - मुंबईसह ठाण्यात आगीत सत्र सुरु असताना कल्याणमध्ये पुन्हा आगीची घटना घडली आहे. कल्याणमधील चायनीज हॉटेलमध्ये सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन जवानाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री पुन्हा एकदा सिलिंडर स्फोटाने आग लागली आहे. शहरातील योगीधाम परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चारजण होरपळून गंभीर जखमी झाले.
योगीधाम परिसरातील त्रिमूर्ती चाळीत रात्री गॅस गळती होत होती. यामुळे राहिवाशांनी संबंधित कंपनीच्या मेकॅनिकला बोलावले होते. गॅस सिलिंडरची तपासणी सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चौघेजण गंभीर भाजले. भाजलेल्या व्यक्तींमध्ये एका लहानग्याचाही समावेश असून पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात भाजलेल्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दिपाली पाटील आणि कल्पना भावे या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.