‘वालधुनी’चे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट; आरोग्य विभागाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:02 AM2018-12-09T00:02:20+5:302018-12-09T00:02:52+5:30
मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
कल्याण : मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण थांबणार कधी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील मलंग गडाच्या डोंगरातून वालधुनी नदी उगम पावते. ती अंबरनाथ ते कल्याण खाडीदरम्यान ३१ किलोमीटर लांब वाहते. नदीच्या तिरावर १० व्या शतकात बांधलेले अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर आहे. १९२३ मध्ये काकोळे येथे ब्रिटिशांनी जीआयपी टँक बांधला. त्याची क्षमता सहा दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची आहे. या टँकमधून कल्याण रेल्वेस्थानकाला पाणीपुरवठा होत असत. परंतु, वाढत्या नागरीकरणामुळे वालधुनी नदीची गटारगंगा झाली आहे. ही नदी उगमापासूनच प्रदूषित असल्याचा अहवाल उल्हासनगरातील चांदीबाई महाविद्यालयाने केलेल्या ‘सेव्ह गुड अर्थ’ या प्रकल्पाद्वारे दिला होता. केंद्रीय प्रदूषण अहवालात देखील ही नदी प्रदूषित असल्याचे म्हटले आहे.
उगम परिसरात या नदीचे पाणी स्वच्छ होते. आता कोकाळे गावानजीक पाणी काळेशार झाले आहे. त्यात रासयानिक कारखाने रसायनमिश्रित सांडपाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. वालधुनी नदी पुढे उल्हास नदीला कल्याण खाडीनजीक जाऊन मिळते. त्यामुळे खाडीही प्रचंड प्रदूषित झाली आहे.
अंबरनाथ तालुक्यात वालधुनी नदीच्या आसपासच्या गावात फळ, भाजीपाल्याची शेती या पाण्यावर केली जात होती. मात्र, आता हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याला गुरेही तोंड लावत नाहीत. सध्या थोडीफार शेती आहे. नदीचे ते दूषित पाणी फळभाज्यांच्या शेतीला वापरल्यास त्यापासून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नदी उल्हासनगर व कल्याणमध्ये अति प्रदूषित आहे. तेच पाणी पुढे कल्याण खाडीत जाऊन मिळते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेस त्याच्याशी काही देणेघेणे नाही. हा एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, या प्रश्नाला उत्तरच नाही.
प्र्रकरण न्यायप्रविष्ट : नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘वनशक्ती’ ही पर्यावरण संस्था २०१३ पासून राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून लढा देत आहे. लवादाने नदी प्रदूषित करणाºयांना ९५ कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र, हा दंड अद्याप भरला गेलेला नाही. या दंडाच्या रकमेतून नदी प्रदूषण रोखले जाणार होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रदूषण कधी थांबणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.