वालधुनी नदी स्वच्छतेसाठी स्थानिक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:37 AM2020-02-26T00:37:51+5:302020-02-26T00:37:54+5:30
नदी परिसराची केली पाहणी; नियम डावलून बांधकामे झाल्याने पुराचे पाणी शिरले होते घरांत
कल्याण : वालधुनी नदीचे केडीएमसीच्या चुकीमुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे योगीधाम आणि आसपासच्या परिसरात थोड्या पावसानेही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. केडीएमसी प्रशासन नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेत नसेल तर आम्ही स्वत: पुढाकार घेऊन नदी स्वच्छता करू, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. भाजप कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी रविवारी नदी परिसराची पाहणी केली.
पश्चिमेतील गौरीपाडा येथील घोलपनगर प्रवेशद्वार ते गुरुआत्मन परिसरातील योगीधाम, भवानीनगर, कैलास गार्डन, वास्तुसिद्धी, त्रिमूर्ती कॉलनी, मिलिंदनगर या भागात जवळपास चाळीस हजार लोकसंख्येची वस्ती आहे. हा संपूर्ण परिसर वालधुनी नदीच्या सखल पात्राला लागून आहे. या सखल भागात काही विकासकांनी आपली बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात बेकायदा भरणी आणि नियमांचे पालन न केल्याने पावसाळयात पुराचे पाणी इमारती तसेच चाळींमध्ये शिरल्याने या परिसरातील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.
या परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. केडीएमसीने या परिसरातील कर माफ करावा, जेणेकरून या पैशाने नदीची आम्हीच सफाई करू,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वालधुनी नदीची रविवारी रत्नपारखी यांच्यासह नदी बिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा, सुनील उत्तेकर, मनसेचे कार्यकर्ते गणेश नाईक, नूर बिरवाडकर, भक्ती साळवी, तृप्ती राणे, शोभा थदानी, जयश्री सावंत आदींनी पाहणी केली.
नदीचा उल्लेख केला नाला
केडीएमसीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पाचे कामही याच भागात होत आहे. भरणीमुळे या भागातील नदीच्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या भागातील विविध बांधकाम तसेच प्रकल्पांना केडीएमसीने मंजुरी देताना वालधुनी नदीचा उल्लेख नाला असा केला असल्याचा आरोप भाजपच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला.