ठाण्याच्या राबोडी परिसरात भिंत कोसळली, 6 वाहनांचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 11:08 AM2018-07-10T11:08:15+5:302018-07-10T11:16:53+5:30
मुसळधार पावसाचा ठाणेकरांना तडाखा
ठाणे : सोमवारपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. ठाण्यात आपत्ती व्यवस्थापनाने सोमवारी मध्यरात्रीपर्यंत 104.36 मिमी पाऊसाची नोंद केली. मात्र मध्यरात्रीनंतर पावसाने अधिकच जोर धरला, सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत ठाण्यात 161.66 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर तब्बल 57 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा तडाखा हा ठाणेकरांना बसला. ठाण्याच्या राबोडी परिसरात 30 फुटांची कोकणी कब्रस्तान, किंजल बिल्डिंग समोर, पंचगंगा रोड, राबोडी नं2, राबोडीची कंपाउंड वॉल कोसळली. ही भिंत बाजूलाच पार्क केलेल्या वाहनांवर पडल्याने बाईक आणि रिक्षासह एकूण सहा वाहनांचं नुकसान झाले आहे.
होंडा अॅक्टिव्हा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, होंडा ड्रीम युवा, हिरो मेस्ट्रो आणि एक रिक्षाचा यामध्य़े समावेश आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य सुरु केले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील 24 तासात ठाण्यात 186.2 मिमी पाऊस पडला असून अनेक पडझाडीच्या घटनाही घडल्या. आपत्ती व्यवस्थापनाकडील घटनांमध्ये सहा आगीच्या तुरळक घटना, 10 झाड पडल्याच्या, 38 ठिकाणी पाणी जमल्याच्या तर भिंत कोसळल्याच्या 4 अशा विविध लहानमोठ्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.