घराची भिंत कोसळून कळव्यात तिघे जखमी
By admin | Published: July 4, 2017 06:47 AM2017-07-04T06:47:45+5:302017-07-04T06:47:45+5:30
कळव्यातील वाघोबानगर परिसरात घराची भिंत खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्यातील वाघोबानगर परिसरात घराची भिंत खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या तिघांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील २ दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रमाण दिसून आले आहे. तर, दुसरीकडे कळवा पूर्वेकडील डोंगर परिसरात वसलेल्या झोपडपट्टीमधील पांडे चाळीत राहणाऱ्या पाठक या कुटुंबीयांच्या घरावर सोमवारी सकाळच्या सुमारास वरच्या बाजूस असलेल्या घराची भिंत पडली. यामध्ये ऊर्मिला पाठक (५०), शिल्पा पाठक (१८) आणि सुरेश पाठक (१२) असे तीन जण यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी महापालिकेनेही मुंब्रा, वागळे, कळवा या डोंगरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, असाच जर जोरदार पाऊस पडला, तर भविष्यात डोंगराळ भागात असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. डोंगरावरची ही सर्व घरे भूमाफियांनी अनधिकृतरीत्या बनवल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. भूमाफियांवर प्रशासनाचा अंकुश नाही, त्यामुळे तक्र ार करूनदेखील ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा आरोप स्थानिक नगरसेवक महेश साळवी यांनी केला.