उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचे थैमान;एकाचवेळी 7 मुलांना चावून केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 07:29 PM2018-12-07T19:29:11+5:302018-12-07T19:31:41+5:30
7 पैकी दोन मुले गंभीर असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याला श्वान पथकाने पकडले आहे.
उल्हासनगर - कॅम्प नं-3 येथील सम्राट अशोकनगर परिसरामध्ये आज सकाळी ९ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाचवेळी तब्बल 7 मुलांना चावा घेतला आणि जखमी केले आहे. 7 पैकी दोन मुले गंभीर असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याला श्वान पथकाने पकडले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-3, सम्राट अशोकनगर येथील रस्त्यावर 5 ते 10 वयोगटातील मुले आज सकाळी 9 वाजता खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांना चावे घेण्यास सुरुवात केली. याप्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मुले इकडे तिकडे पळत सुटली. आरुषी यादव, दक्ष रोकडे, रोशनी गवई, विवेक पालिवाट, मानसी धोडे, दीपक जावा आणि कुणाल चव्हाण या ७ मुलांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यापैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली. मध्यवर्ती रुग्णालयात मुलावर उपचार सुरू आहेत. स्थानिक नगरसेविका सविता तोरणे रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन मुलांच्या उपचाराबाबत चौकशी केली. तसेच पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती पालिकेच्या श्वान पथकाला देऊन कुत्रा पकडून लांब सोडण्यास सांगितले. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील बहुतांश कचराकुंड्या रस्त्याच्या बाजूला असून हॉटेल, चायनीज दुकाने व घरगुती अन्न कचराकुंडीत टाकले जाते. अन्नाच्या शोधत असलेल्या कुत्र्यांनी कुंड्याभोवती थैमान घातले आहे. 5 ते 15 च्या कळपाने राहणाऱ्या कुत्र्याचा धसका सर्वसामान्य नागरिकांनी घेऊन, रात्रीच्या 10 नंतर बाहेर पडत नाही. असे चित्र शहरात निर्माण झाले. दरमहा 400 कुत्रा चावल्याच्या घटना शहरात घडत असून तशी नोंद मध्यवर्ती रुग्णालयात आहेत. महापालिकेने 2 हजार श्वान निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला असून कुत्र्याच्या संख्येत कमी झाले नाही.