भटकंती कट्ट्यावर उलगडली ‘विष्णू द गामा’ची रंजक सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:04 AM2019-12-27T00:04:17+5:302019-12-27T00:04:39+5:30
ठाण्यात कार्यक्रम : ५० देशांमध्ये पायी फिरले
ठाणे : जग फिरण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मनाशी बाळगत ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अपार मेहनत करणारा फिरस्ता म्हणजे विष्णूदास चापके. त्यांनी तीन वर्षांत तीन खंड आणि सुमारे ५० देशांमध्ये पायी भटकंती केली आहे. या पायी केलेल्या भटकंतीवेळी आलेले विविध रंजक अनुभव ऐकण्याची संधी अलीकडेच ‘भटकंती कट्टा’ ठाणे यांनी आयोजित केलेल्या ‘विष्णू द गामा’ या कार्यक्र माच्या निमित्ताने मिळाली.
मराठवाड्यातील परभणी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चापके यांना जग फिरण्याची प्रेरणा समुद्रमार्गे बोटीतून जगप्रदक्षिणा करणारे नौदल अधिकारी कप्टन दिलीप दोंदे यांच्याकडून मिळाली. जगप्रदक्षिणा करण्याचा विचार मनात आला तरी तो प्रत्यक्षात आणणे अतिशय कठीण होते. अनेक अडीअडचणी आल्या. सर्वात मोठी अडचण होती ती पैशांची. परंतु सुहृदांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे ही जगप्रदक्षिणा पूर्ण करता आली, असे चापके यांनी नमूद केले. त्यांना आलेले भलेबुरे अनुभव, एकट्याने परदेश प्रवास करताना पैशांचे नियोजन कसे करायचे, एका देशातून दुसऱ्या देशात जाताना व्हिसा काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याबाबत त्यांनी माहिती दिली.
विश्वप्रदक्षिणेवेळी चापके चिली देशात असताना तिथे लागलेल्या वणव्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते. जर्मनी, अमेरिकेची विमाने पाणी फवारणी करुन जंगलात लागलेला वणवा विझवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांना आईचा फोन आला. पंधरा दिवसांपूर्वी ही ते तिथेच होते आणि आताही तू तिथेच का असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा चापके यांनी आईला कारण सांगितले.