सुसाट वाहतूक हवी आहे? तर कोंडीचीदेखील तयारी ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:54 AM2018-01-16T00:54:16+5:302018-01-16T00:54:18+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरसावे येथील उल्हास नदीवरील जुन्या पुलाला ५० वर्षे झाली आहेत, तर त्या नंतर बांधलेल्या पुलालाही १८ वर्षे झाली आहेत.
- धीरज परब, मीरा रोड
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरसावे येथील उल्हास नदीवरील जुन्या पुलाला ५० वर्षे झाली आहेत, तर त्या नंतर बांधलेल्या पुलालाही १८ वर्षे झाली आहेत. जुन्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन १९६४ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले होते. तर उद्घाटन १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही कमालीची वाढली. त्याकाळात बांधलेला पूल सध्या अरुंद पडत आहे. या पुलाने क्षमतेपेक्षा अधिक वाहनांचा भार सहन केला आहे. त्याचबरोबर पुलालगतचा अमाप रेतीउपसा, रेतीचा बार्ज अडकून झालेला अपघात यामुळे हा पूल कमकुवत झाला आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये पुलाच्या बीमचे प्लास्टर कोसळल्याने दुरुस्तीसाठी तो चार महिने बंद होता. पुन्हा सप्टेंबर २०१६ मध्ये गर्डरला तडा गेल्याने नऊ महिने पूल बंद ठेवण्यात आला. त्यावेळी लगतच्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू ठेवल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागला. तास-दोन तास त्यात वाहने अडकून पडत असत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहतूक वळवली आणि ठाणे, भिवंडी भागातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली.
देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा हा महामार्ग असतानाही शासनाकडून वेळीच आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. मुळात पुलाची दुरुस्ती, कशा पद्धतीने करायची यातच काही महिने घालवण्यात आले. नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी देण्यापर्यंतची प्रक्रियाही कासवगतीनेच पार पडली. निविदा काढल्यानंतर कंत्राटावरून झालेला वाद नेमका काय होता, हे सत्य देखील नागरिकांपर्यंत आले पाहिजे. कंत्राट मिळवण्याचे प्रकरण न्यायालयात गेले. तेथील कामकाजात वर्ष गेले. अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुटल्यानंतर पर्यावरणाच्या परवानगीचा नवीन मुद्दा उभा ठाकला. वास्तविक प्रस्ताव तयार केल्यानंतरच पर्यावरण विभागाकडून पुलाच्या कामासाठी परवानगी मिळवली असती तर पुन्हा वेळ वाया गेला नसता. परंतु, या साºया विलंबाबाबत गडकरी यांनी नागरिकांची जाहीर माफीही मागितली. २४७ कोटींच्या चौपदरी पुलाचे भुमिपुजन झाल्याने काम सुरु होऊन पुर्ण कधी होते याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.
सध्या वाहतुक कोंडीमुळे इंधन, वेळेचा अपव्यय होऊन वायु व ध्वनी प्रदुषणात भर पडत आहे. नवीन पुलाच्या मागणीसाठी भार्इंदरचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांच्यापासून शिवसेना, मनसे, काँग्रेस, बविआ आदी विविध पक्ष व त्यांच्या नेत्यांनी पत्रव्यव्हार केले. घेराव घातले. शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार राजन विचारे असो की मग स्थानिक आमदार प्रताप सरनाईक असोत त्यांनीही प्रयत्न केले. प्रसिध्दीमाध्यमांनीही हा प्रश्न सातत्याने लावून धरला. नागरिकांचीही मागणी होती. त्यामुळे मी गडकरींना भेटलो आणि नवीन पुलाला मंजुरी मिळाली, असा दावा करुन भाजपाच्या नेत्याने एकट्याने श्रेय लाटण्याचा केलेला खटाटोप हा राजकीय पोरकटपणाच म्हटला पाहिजे. थेट दिल्ली स्तरावरच्या या पुलाचा प्रश्न काय फक्त भाजपाच्या नेत्याच्या भेटीसाठीच शिल्लक होता, यावर कोणाचा विश्वास बसेल ?
गेली चार वर्ष प्रवासी-वाहनचालक वाहतुक कोंडीने त्रासलेले होते व आजही आहेत. तेव्हा तसेच विविध कारणांनी पुलाच्या मंजुरीसाठी झालेल्या दिरंगाईवेळी हे श्रेय लाटणारे नेते कुठे होते? ज्येष्ठ मंत्री असूनही गडकरी यांनी हाल झाल्याबद्दल जाहीरपणे लोकांची क्षमा मागितली. पण भुमिपूजनाचे श्रेय लाटणाºया स्थानिक नेतृत्वाने तर या काळात जनतेकडे साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. गडकरी व मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी
आणि महापालिकेला जाहीर चांगले सल्ले दिले, सूचना पण केल्या. त्यामुळे पुलाच्या कामाचे श्रेय एकट्याने लाटण्यासाठी जेवढा खटाटोप भाजपा नेतृत्वाने केला, तेवढा खटाटोप आता ते वरिष्ठ नेत्यांनी दिलेले सल्ले व सूचना अंमलात आणण्यासाठी करतील का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
पुलाचे व जोडमार्गाचे काम सुरु झाल्यावर प्रशासनाची-अन्य यंत्रणांची खरी कसोटी लागणार आहे. नागरिकांनाही या काळात समजुतदारपणा दाखवावा लागेल. कारण या काळात सतत, वेगवेगळ््यावेळी मोठी वाहतुक कोंडी होणार आहे. वाहतुकीचे कितीही नियोजन केले तरी कोंडी होणार हे निश्चीतच आहे.
पण पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुक सुरु झाली की या मार्गावरुन रोज जाणाºया हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. घोडबंदर मार्गावरुन ठाण्याकडे जाणाºया वाहनांसाठी वरसावे जंक्शनखालून मार्गिका होणार आहे, तर ठाण्याकडून येणाºया वाहनांनाही जंक्शनखालून जाऊन गोल फिरुन महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे येथील सिग्नल व नाका संपुष्टात येणार आहे. परंतु ठाण्याहून मुंबई व मीरा-भार्इंदरकडे येणाºया वाहनांसाठी
मार्गिका अपुºया असल्याने वाहनकोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण पुलामुळे व जंक्शनवरील भुयारी मार्गामुळे प्रवास सुसाट होईल.
घोडबंदर खिंडीचे रुंदीकरण करुन हा महामार्गही सहापदरी केला जाणार आहे. यामुळे घोडबंदर खिंड व चढणीवर होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल. पण ही राष्ट्रीय उद्यानाची हद्द असून येथे डोंगर आणखी फोडावा लागेल. शिवाय वरसावेचा नवीन पूल, जोडरस्ता व खिंडीच्या रुंदीकरणादरम्यान ८२३ झाडांचा बळी दिला जाणार आहे.
या शिवाय पांडुरंगवाडी व सगणाई चौकातही लहान पुलाची कामे होणार आहेत. त्यामुळे दहीसर चेकनाक्यापासून वरसावेपर्यंत होणाºया या विविध कामांमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण या सर्व ठिकाणी एकाच वेळी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार असल्याने अवघड जबाबदारी महामार्ग प्राधिकरण, पोलीस, पालिका, जिल्हा प्रशासनासह ठेकेदारावर आहे. नागरिकांनाही वाहतुक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे किंवा अन्य मार्गाचा अवलंब
करावा लागेल. मालवाहतुक
करणारे ट्रक, कंटेनर आदींमुळे जास्त वाहतुक कोंडी होत असल्याने त्यांच्या वाहतुकीचे नियोजन काटेकोर न झाल्यास मीरा- भार्इंदरमधून जाणारा महामार्ग, दहीसर, घोडबंदर मार्ग, वसईच्या दिशेकडील महामार्ग तसेच अगदी ठाणे शहर, भिवंडी आदी भागात चक्काजामची वेळ येऊ शकते.