प्रत्येक प्रभाग समितीत हव्या भाजी मंडई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:36+5:302021-09-03T04:42:36+5:30
ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाली ...
ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाली आहे. परंतु पालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही अंतिम झालेले नाही. त्यातही पालिकेने शहराच्या विविध भागात असलेले भाजी मंडईचे क्षेत्रदेखील विकसित केलेले नाहीत. शहरात केवळ गावदेवी, जांभळी नाका आणि महात्मा फुले भाजी मंडईच आहे. शहराच्या इतर भागात मंडई नसल्याने नागरिकही घराजवळील फेरीवाल्यांकडूनच खरेदी करीत असतात. त्यामुळे असे भूखंड केव्हा विकसित होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
फेरीवाल्यांची समस्या ही ठाण्यासाठी नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक वेळा फेरीवाल्यांचा प्रश्न गाजलेला आहे. परंतु अद्यापही त्यांची समस्या पालिका प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांना सोडविता आलेली नाही. फेरीवाल्यांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यातही ठाण्यात जांभळी नाका, गावदेवी आणि मार्केटमध्ये महात्मा फुले भाजी मंडई आहे. परंतु त्यातही गावदेवी भाजी मंडईत भाजी विक्रेते कमी आणि कपडेवाल्यांचीच दुकाने अधिक आहेत. येथील अनेक भाजी विक्रेत्यांनी आपले ओटे कपडे विकणाऱ्यांना भाड्याने दिले आहेत. तिकडे मार्केटमधील महात्मा फुले भाजी मंडई कित्येक वर्षांपासून ओस पडली आहे. खालील बाजूस मच्छी विक्रेते बसलेले आहेत. परंतु पहिल्या माळ्यावर जाण्यास भाजी विक्रेते तयार नाहीत. त्यामुळे ही मंडई ओस पडली आहे. कळव्यातील भाजी मार्केटचे काम मागील कित्येक वर्षापासून सुरु आहे. परंतु तेदेखील अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही.
वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी खेवरा सर्कल येथे भाजी मंडई उभारण्यात आली. परंतु त्याठिकाणी फेरीवाले जाण्यास तयार नसल्याने त्या ठिकाणी एसआरएचे कार्यालय सुरु आहे. दुसरीकडे शहराच्या प्रत्येक भागात भाजी मंडई विकसित करण्याची गरज असल्याचा मतप्रवाह आता वाहू लागला आहे.