रुग्णालयातील वॉर्ड बॉय दारूच्या नशेत टुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:25 AM2019-11-15T01:25:43+5:302019-11-15T01:25:46+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आॅर्थो विभागात काम करणारा नाथा मोहतमल हा वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात मदहोश अवस्थेत पडलेला आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली.
ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आॅर्थो विभागात काम करणारा नाथा मोहतमल हा वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात मदहोश अवस्थेत पडलेला आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. ही बाब समोर येताच रुग्णालय प्रशासनाने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवून त्याला सक्तीच्या रजेवरही पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ठामपाच्या कळवा रु ग्णालयात दररोज सुमारे दोन हजारांहून अधिक रु ग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नाथा नावाचा वॉर्ड बॉय रु ग्णालयाच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत पडलेल्या अवस्थेत आढळला. तो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र मांक ९ येथील आॅर्थो विभागात काम करतो. या वॉर्डातील डॉक्टरांनी त्याच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांची फाइल दिली होती.
मात्र, त्याने ती संबंधित विभागात न पोहोचवता दारूच्या नशेत रु ग्णालयाच्या आवारात असलेल्या हिरवळीवर गणवेशावरच तो मदहोश अवस्थेत पडला होता. तसेच त्याच्याजवळच कागदपत्रांची फाइल पडली असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा चर्चेचा विषय झाला होता. रु ग्णालयाच्या आवारात गस्त घालत असताना रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना हे दृश्य दिसले. त्यांनी तत्काळ रु ग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता प्रशासनाने त्याला रात्री ११ च्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, त्याचे रक्त तपासणीकरिता काढून घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता रुग्णालय सूत्रांनी वर्तवली आहे.
>नाथा हा वॉर्ड बॉय जेव्हा कामावर आला होता, तेव्हा त्याने मद्यप्राशन केले नव्हते. पण, मधल्या वेळेत त्याला जेव्हा त्याच्या वरिष्ठांनी कार्यालयीन काम सांगितले आणि तो बाहेर गेला होता. त्यानंतर तो तब्बल एक ते दीड तास न परतल्याने त्याचा शोध घेतला असता तो रु ग्णालयाच्या आवारातील हिरवळीवर पडलेला रु ग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना आढळला. याबाबत माहिती मिळाल्यावर आपण त्वरित त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अहवाल महापालिकेच्या कार्मिक विभागाकडे पाठवला जाईल.
- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय.