प्रभाग समित्या प्रथमच महिलांकडे

By admin | Published: July 6, 2017 06:00 AM2017-07-06T06:00:11+5:302017-07-06T06:00:11+5:30

केडीएमसीच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व महिला उमेदवारांची बिनविरोध निवड

Ward committee committees first time for women | प्रभाग समित्या प्रथमच महिलांकडे

प्रभाग समित्या प्रथमच महिलांकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी व मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी केली. प्रत्येक प्रभागात एकाच नगरसेविकेचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे शुक्रवारीच अर्ज भरण्याच्या दिवशी स्पष्ट झाले होते. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. केडीएमसीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची निवड झाली आहे.
पुरेशी संख्या नसतानाही शिवसेनेच्या कृपेने ‘अ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मनसेच्या सुनंदा कोट या देखिल निवडून आल्या आहेत. ‘ब’ प्रभागात शिवसेनेच्या मनीषा तारे, ‘ह’ प्रभागात रेखा म्हात्रे, ‘क’ प्रभागात एमआयएमच्या शकीला खान, ‘आय’ प्रभागात बसपाच्या सोनी अहिरे, ‘जे’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सुमन निकम, ‘ड’ प्रभाग हेमलता पावशे, ‘फ’ प्रभाग खुशबु चौधरी, ‘ग’ प्रभाग अलका म्हात्रे तर ‘इ’ प्रभाग दमयंती वझे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होताच प्रारंभी सर्व उमेदवारांच्या अर्जांची मेहता यांनी छाननी केली. यात दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यानंतर नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. परंतु, यात कोणीही अर्ज मागे घेतला नाही. यानंतर प्रत्येक प्रभाग समितीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे मेहता यांनी जाहीर केले.
पिठासीन अधिकाऱ्यांना पत्रकारांचे वावडे
प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. या निवडणुकीत सर्व उमेदवारांची केवळ बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा होणार होती, असे असतानाही पत्रकारांना प्रवेश नाकारण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वार्तांकन करू न देणे ही पहिलीच वेळ आहे. मेहता यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेतल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सेनेचा भाजपाला ठेंगा

‘अ’ प्रभाग समितीत स्वत:च्या पक्षाचे सूचक अनुमोदक नसतानाही मनसेच्या सुनंदा कोट या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. या प्रभागात शिवसेना पाच, भाजपा एक, मनसे दोन, अपक्ष एक आणि राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे.
शिवसेनेने युतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपाला साथ देण्याऐवजी त्यांना ठेंगा दाखवत विरोधीपक्ष असलेल्या मनसेच्या नगरसेवकाला हात दिल्याचे प्रभाग समितीच्या निवडणुकीतून समोर आले आहे. आगामी महापौर निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेनेने ही खेळी खेळल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

कोट यांना कारणे
दाखवा नोटीस
शिवसेनेचे सूचक आणि अनुमोदक घेणाऱ्या आणि स्वपक्षाला अंधारात ठेवून प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या मोहने कोळीवाडा प्रभागाच्या नगरसेविका सुनंदा कोट यांना मनसेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी कोट यांना नोटीस बजावून त्यांना सात दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. यावर कोट आता काय कारण पुढे करतात? आणि त्यांच्या खुलाशावर पक्ष पुढे कोणती भूमिका घेतो? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Ward committee committees first time for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.