प्रभाग समित्यांची खरोखर गरज आहे का?
By admin | Published: July 3, 2017 06:13 AM2017-07-03T06:13:41+5:302017-07-03T06:13:41+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकांतर्गत असलेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका बुधवारी होत आहेत. प्रभाग स्तरावरील नागरी समस्यांचे
प्रशांत माने/लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकांतर्गत असलेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका बुधवारी होत आहेत. प्रभाग स्तरावरील नागरी समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने या समित्या स्थापन करण्यात आल्या असल्या, तरी वर्षभराचा या समित्यांचा कारभार पाहता त्यांच्या फारशा बैठकाही झाल्या नाहीत. परिणामी, प्रभागातील समस्या आणि प्रश्न जैसे थे राहत असल्याने वारेमाप खर्च होणाऱ्या समित्यांची गरजच काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिकेंतर्गत प्रारंभी सात प्रभाग होते. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रभागरचनेत बदल होऊन आज १० प्रभाग अस्तित्वात आहेत. प्रभाग स्तरावरील भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांचा समावेश असणाऱ्या प्रभाग समित्या स्थापन झाल्या. प्रभाग अधिकारी आणि नगरसेवकांची महिन्याला साधारण एकतरी बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, वर्षभराचा आढावा घेता काही समित्यांचा अपवाद वगळता काहींची एकही बैठक झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
ड प्रभाग याचे उदाहरण असून इतर प्रभागांतही जेमतेम ५ ते ६ बैठका झाल्या आहेत. तर, ह प्रभागात झालेल्या बैठका या बहुतांशवेळा गणसंख्येअभावी तहकूब कराव्या लागल्या आहेत. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांना २५ हजार रुपये वाहनभत्ता मिळतो तसेच तीन हजार अतिथीभत्ताही मिळतो. याउपरही काही अपवाद वगळता काही अध्यक्षांना बैठकांचे वावडे असल्याने त्यांच्यावर नाहक खर्च करायचा तरी कशाला, असा सवालही उपस्थित होत आहे.
प्रभाग स्तरावर पुरेशा बैठका होत नसल्याने प्रभागातील समस्यांवर स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये प्रभागातील समस्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम सुरू असते. जर प्रभाग स्तरावर नियमित बैठका होऊन तेथेच समस्यांचे निराकरण झाले, तर स्थायी आणि महासभेचा निरर्थक वेळ वाया जाणार नाही, याचीही जाण नगरसेवकांना नसणे, ही शरमेची बाब आहे. याला अपवाद ग आणि फ प्रभाग समिती ठरली असून त्यांच्या नियमित बैठका होतात. समित्यांना आर्थिक अधिकार नसणे, हे प्रमुख कारण या उदासीनतेला पोषक असे ठरत असून त्यामुळेच बैठका घेतल्या जात नसल्याचे बोलले जाते.
अंदाजपत्रकाचे अधिकार मिळावेत
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रभाग स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार मिळावेत, अशीही मागणी होत आहे. आता पुन्हा एकदा प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. यावेळी दहाही प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहेत.
एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. बुधवारी यावर शिक्कामोर्तब होईल. नव्याने निवडून येणाऱ्या अध्यक्षांनी तरी नियमित बैठका घेऊन प्रभागस्तरावरील समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर करावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.