प्रभाग अधिकारी भांगरे वैद्यकीय रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:07 PM2018-03-28T17:07:59+5:302018-03-28T17:07:59+5:30
कल्याण: २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महासभेने केलेल्या निलंबनाच्या ठरावामुळे चर्चेत आलेले ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील कार्यभार हा ह प्रभागाचे अधिकारी अरूण वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेकायदा बांधकामांना पाठिशी घालित असल्याच्या आरोपाखाली वानखेडे आधीच वादग्रस्त असताना त्यांना अशा बांधकांमांचे माहेरघर असलेल्या प्रभागाचे अधिकारीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भांगरे यांच्याकडे प्रारंभी जे प्रभागाची जबाबदारी होती. परंतू ई प्रभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांच्यावर बेकायदा बांधकामावरच्या कारवाईत कुचराई केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची कारवाई माजी आयुक्त पी वेलरासू यांच्यावतीने करण्यात आली. ई प्रभागाच्या रिक्त झालेल्या अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जे प्रभागाचे अधिकारी भांगरे यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान फेब्रुवारीच्या अखेरीस घडलेल्या अपहरण नाटयात भांगरे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून विरोधीपक्षनेते मंदार हळबे आणि भाजपाचे नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचे पडसाद महापालिकेच्या महासभेत उमटले होते. भांगरे यांच्या गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेचा निषेध करीत सर्वपक्षिय सदस्यांनी भांगरे यांच्यासह बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि उपायुक्त सुरेश पवार यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. दरम्यान प्रकृती बिघडल्याने भांगरे हे वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार ह प्रभागाचे अरूण वानखेडे यांच्याकडे देण्यात आला आहे. वानखेडे हे ह प्रभागाचे अधिकारी आहेत यापुर्वी ते क प्रभागाचे अधिकारी होते त्यावेळी त्यांच्याविरोधात वाढीव आणि बेकायदा बांधकामांना अभय दिल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवकांकडून करण्यात आल्या होत्या. ह प्रभागात आल्यानंतरही ही परिस्थिती सुधारलेली नाही. आजही या परिक्षेत्रात राजरोसपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. आता भांगरे यांचा कार्यभार वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ई प्रभागात सक्षम अधिकारी नियुक्त करणे अपेक्षित असताना वानखेडे यांच्याकडे दिलेली जबाबदारी चर्चेचा विषय ठरली आहे. भांगरे यांच्याकडे जे प्रभागाचा कार्यभार देखील होता त्यामुळे तेथील कार्यभार कर अधिक्षक दिपक शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता भांगरे हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्या जागी संबंधित अधिका-यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे कायमस्वरूपी नाही असे सांगण्यात आले.